नाशिक : उद्यानाच्या ठेकेदारांना महापालिकेचा हिसका, 138 उद्यानांत त्रुटी; आठ लाखांचा दंड

नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेची शहरातील जवळपास 300 उद्याने ही देखभाल दुरुस्तीसाठी ठेकेदारांच्या हवाली करण्यात आली आहेत. ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे यातील बहुतांश उद्याने भकास झाली असून, 138 उद्याने भकास करणार्‍या ठेकेदारांना महापालिकेने हिसका दाखवत आठ लाखांचा दंड केला आहे. दरम्यान, मनपाच्या उद्यान विभागाला आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता केली जात नाही तापर्यंत पुढील देयके अदा न करण्याचे निर्देश उपआयुक्त (उद्यान) विजयकुमार मुंडे यांनी दिले आहेत.

नाशिक शहरामध्ये महापालिकेचे एकूण 550 इतकी छोटे मोठे उद्याने आहेत. सर्वच उद्यानांची देखभाल दुरुस्ती ठेवण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने 550 पैकी जवळपास 300 हून अधिक उद्याने देखभालीकरता ठेकेदारांच्या हवाली केली आहेत. गेल्या अडीच तीन वर्षांपासून संबंधित उद्याने ठेकेदारांच्या ताब्यात असून, उद्यानांसाठी ठेकेदारांना मनपाकडून दरमहा जवळपास 52 लाख रुपयांचा निधी अदा केला जातो. असे असूनही ठेकेदारांच्या ताब्यात असलेली बहुतांश उद्याने आजमितीस भकास झाली आहेत. उद्यान देखभालीसाठी ठेकेदारांनी केवळ नावाला बिगारी कामगार दाखवून एक प्रकारे महापालिकेची फसवणूक केली आहे. कामगार नसल्याने वृक्षसंवर्धन, वृक्षांना पाणी घालणे, वाढलेले गवत कापणे, कचरा साफ करणे, उद्यानातील खेळण्यांकडे लक्ष देणे अशा अनेक प्रकारच्या जबाबदार्‍या ठेकेदारांवर सोपविण्यात आलेल्या आहेत. परंतु, बहुतांश ठेकेदारांकडून केवळ दरमहा देयके घेतले जाते आणि उद्यान विभागातील वृक्ष निरीक्षकांकडूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने उद्यानांमधील समस्यांमध्ये वाढच होत आहे.

याच बाबींची दखल घेत महापालिकेत काही महिन्यांपूर्वी रुजू झालेले मनपाचे उपआयुक्त विजयकुमार मुंडे यांनी ठेकेदारांच्या ताब्यात असलेल्या 300 उद्यानांची पाहणी करत त्यापैकी त्रुटी आढळून आलेल्या 138 उद्यानांच्या देखभालीबाबतचे निर्देश ठेकेदारांना देऊन सुमारे आठ लाख रुपयांचा दंड केला आहे. दंड वसूल करण्याबरोबरच त्रुटींची पूर्तता केल्यानंतरच संबंधित ठेकेदारांची पुढील देयके अदा करण्याचे आदेशही उपआयुक्त मुंडे यांनी उद्यान विभागाला
दिले आहेत.

उद्यानांत कचरा जाळण्याचे प्रकार
प्रदूषण निर्माण होऊ नये, म्हणून कचरा जाळल्यास महापालिकेकडून दंड आकारला जातो. स्वच्छता झाल्यानंतर बर्‍याचदा नागरिक तसेच सफाई कामगारांकडून कचरा कुंडीवर, रस्त्यावर कचरा जाळण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे याबाबत मनपाने परिपत्रक जारी करत कोणत्याही प्रकारचा कचरा न जाळण्याची सूचना केली आहे. असे असताना ठेकेदारांच्या माणसांकडून उद्यानातील कचरा घंटागाडी न देता वा योग्य प्रकारे विल्हेवाट न लावता तो जाळला जात असल्याची बाब जुने सिडकोतील बाळासाहेब ठाकरे उद्यानात (भुजबळ फार्मजवळ) समोर आली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : उद्यानाच्या ठेकेदारांना महापालिकेचा हिसका, 138 उद्यानांत त्रुटी; आठ लाखांचा दंड appeared first on पुढारी.