नाशिक : ओझरखेड धरणाचा परिसर विकासाच्या प्रतीक्षेत

ओझरखेड धरण www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी) : समाधान पाटील

जिल्ह्यातील पर्यटनाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून नाशिक – गुजरात मार्गावरील ओझरखेड धरण क्षेत्र पर्यटन विकासाच्या कामास सात वर्षांच्या खंडानंतर सुरुवात झाली आहे. मात्र, येथील दुसऱ्या टप्प्याच्या कामास अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याने धरण परिसर विकासाच्या प्रतिक्षेत आहे.

नाशिक – वणी – सापुतारा मार्गावर असलेले ओझरखेड धरण हे येथील ये-जा करणा-या मार्गस्थ होणाऱ्यांना खुणावते. नाशिकपासून ४० किलोमीटर अंतरावरील या परिसरात सूर्यास्ताचे विहंगम दृश्य पाहण्यासारखे असते. धरणापासून सप्तशृंगगड केवळ ३० किलोमीटर तर थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे गुजरातमधील सापुतारा ५५ किलोमीटर अंतरावर आहे. या मार्गावरून मार्गस्थ होणारे प्रवासी घटकाभर का होईना धरणावर थांबतात. धरणाच्या मध्यभागी छोटेखानी टेकडी आहे. सायंकाळी सुर्यास्ताचे विलोभनीय दृष्य तर पर्यटकांना मनमोहीत करत असल्याने आद्यशक्तीपीठ सप्तशृंग गडावर येणारे भाविकांबरोबरच सापुतारा या पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण ठरते.

येथील निसर्गरम्य अशा ओझरखेड धरण येथे ९ वर्षांपूर्वी तत्कालीन पर्यटन मंत्री व पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ओझरखेड धरणास पर्यटन स्थळाचा दर्जा देत पर्यटन स्थळ विकसित करण्याचे कामास मंजुरी दिली होती. तसेच यासाठी पर्यटन विभागाने तब्बल ५ कोटी ८८ लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी या प्रकल्पाला दिली. पहिल्या टप्प्यातील पर्यटन स्थळ विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार प्रस्तावित जागेत कुंपण घालणे, लॅण्ड स्केपिंग, क्लब हाऊस, जेटी बांधणे, कारंजा, रेस्टॉरंट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहनतळ आदी कामांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर या प्रकल्पावर सुरुवातीच्या तीन वर्षात सथंगतीने काम करुन ३ कोटी ६० लाख रुपये खर्च करण्यात आले. त्यानंतर युती सरकारच्या काळात हे काम जवळपास बंद पडले. दरम्यान ऑगस्ट, २०२१ मध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी याबाबत तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या समवेत पर्यटन व जलसंपदा अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये अपूर्णावस्थेतील असलेले काम पूर्ण करण्या बाबत कार्यवाही करण्यासाठी अडीच कोटींचा निधीची  मंजुरी देण्यात आली. त्यानुसार गेल्या तीन- चार महिन्यांपासून अपूर्णावस्थेतील रखडलेले कामास प्रारंभ झाला.

आऊट डोअर गेम, हॉटेलसाठी इमारत उभारण्यात आली आहे. यामध्ये ॲडमिन बिल्डिंगही तयार असून रंगरगोटी करण्यात येत आहे. मात्र विद्युत फिटींग व खिडक्या बसवण्याची कामे बाकी आहे. तसेच दोन डोमच्या फरशा व इतर कामे सुरु आहेत. या कामाचे संबधीत ठेकेदाराकडून कामासाठी वापरण्यात येणारे बांधकाम साहित्याचा दर्जा सुमार असला तरी, मोठ्या प्रतिक्षेनंतर आडकाठी नको म्हणून स्थानिकांची चिडीचूप असली तरी संबधीत विभागाने वेळोवेळी लक्ष देवून दर्जेदार काम करुन घेणे आवश्यक आहे. १४ हेक्टरवर वॉलकंपाऊंड व पार्किंग व्यवस्था करून पाथ वे करण्यात आलेल्या कामाची सात वर्षात अनेक ठिकाणी पडजड, तडे गेल्याने पुन्हा त्यांची दुरुस्ती करावी लागणार असून पार्किंग व्यवस्था, फाऊंटेन, लॉन्स अशी विविध कामे बाकी आहेत. या धरणात १ किलोमीटर अंतरावर ५ एकरचे बेट असून, येथे लक्झरी सूट प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे येथे जाण्यासाठी व धरणाला फेरफटका मारण्यासाठी बोटींगची सुविधा येथील आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार असल्याने त्यामूळेच खऱ्या अर्थाने ओझरखेड धरणावरील पर्यटकांचा ओढा वाढण्यास मदतच होणार आहे. जलसंपदा विभाग येथे हे बेट विकसित करणार असून त्यासाठी आवश्यक परवानगी व निधींची तरतुद करणे गरजेचे आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ओझरखेड धरणाचा परिसर विकासाच्या प्रतीक्षेत appeared first on पुढारी.