नाशिक : कचरा साचल्याने १९ व्यापाऱ्यांना नोटिसा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील महात्मा गांधी रोडवरील जिल्हा परिषदेच्या स्टेडियम कॉम्प्लेक्समधील चार इमारतींमध्ये कचरा साचल्याप्रकरणी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या पथकाने अचानक पाहणी करत तेथील १९ व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. सात दिवसांमध्ये संबंधितांना उत्तर द्यावे लागणार आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. डासांच्या अळ्याही आढळत आहे. ही बाब लक्षात घेत महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन व मलेरिया विभाग सातत्याने आस्थापनांना नोटिसा पाठवून तातडीने स्वच्छता करण्याचे आदेश दिले आहेत. स्वच्छता न करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई केली जात आहे. अशातच महात्मा गांधी रोड येथील जिल्हा परिषद मालकीच्या स्टेडियम कॉम्प्लेक्स इमारतीत तसेच लगतच्या व्यापारी आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कचरा साचल्याच्या तक्रारी आहेत. तसेच बेसमेंटमध्ये पावसाचे पाणी साचून मोठमोठी डबकी तयार झालेली आहेत. ही बाब लक्षात घेत घनकचरा व्यवस्थापन संचालक विभागाने अचानक पाहणी करून १९ व्यापाऱ्यांना नोटिसा दिल्या. येत्या सात दिवसांत खुलासा करण्यास सांगितले आहे.

महात्मा गांधी रोडवरील चार इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अस्वच्छता आढळून आली आहे. तसेच पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला झाला आहे. संबंधित 19 व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. प्रत्येक खासगी आस्थापनेने स्वच्छता राखण्याची काळजी घेतली पाहिजे. मलेरिया विभागाकडूनदेखील नोटिसा दिल्या आहेत.

– डॉ. आवेश पलोड, संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग, मनपा

हेही वाचा :

The post नाशिक : कचरा साचल्याने १९ व्यापाऱ्यांना नोटिसा appeared first on पुढारी.