नाशिक : काजवा महोत्सवाची पर्यटकांसाठी पर्वणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मान्सूनची चाहूल लागली की पर्यटकांसह निसर्गप्रेमींची पावले हमखास भंडारदऱ्यातील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याकडे वळतात. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जून महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांपर्यंत भंडारदरा परिसरात लखलखणाऱ्या काजव्यांचा निसर्गाविष्कार पाहण्याची संधी मिळते. यंदा पर्यटन विभागाने ३ व ४ जून २०२३ रोजी भंडारदरा, ता. अकोले, जि. अहमदनगर येथील पांजरे गावामध्ये ‘काजवा महोत्सव’ आयोजित केला आहे.

दोन दिवस चालणाऱ्या काजवा महोत्सवामध्ये येणाऱ्या पर्यटकांना प्रशिक्षित मार्गदर्शकासोबत काजवे पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचादेखील आनंद घेता येणार आहे. जे पर्यटक भंडारदरा येथे मुक्काम करू इच्छितात, त्यांच्यासाठी सशुल्क टेंट सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ठिकाणी स्थानिक आदिवासी लोकांनी उत्पादन केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. त्यात प्रामुख्याने भंडारदरा परिसरातील काळा भात व विविध भरड धान्य यांची विक्री तसेच त्यापासून बनवण्यात येणारे विविध पदार्थदेखील मिळणार आहेत. दरम्यान, काजवा महोत्सवासाठी पर्यटन विभागाकडून नियमावली तयार करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांविरोधात कारवाई केली जाणार आहे. या महोत्सवावर वन्यजीव विभागाचाही वॉच राहणार असून, रात्री दहानंतर पर्यटकांना काजवे बघण्यासाठी वनक्षेत्रात प्रवेश बंदी असणार आहे. तसेच वृक्षांवर बॅटऱ्या चमकविण्यासह मोबाइल फ्लॅशदवारे फोटो घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

असे आहेत नियम

वाहने वाहनतळावरच उभी करावी, बॅटरीचा वापर केवळ रस्ता पाहण्यासाठी करावा, काजवे पाहताना मोबाइल अथवा कॅमेऱ्याचा फ्लॅश चमकवू नये. काजवे असलेल्या झाडांपासून किमान ५० फूट अंतर राखावे, मोठ्याने आवाज करू नये, गाणी लावू नयेत, तसेच गाडीचा हॉर्न मोठ्याने वाजवू नये.

काजवा हा अतिशय संवेदनशील कीटक असून, मे-जून महिना हा त्याचा प्रजनन काळ असतो. त्यामुळे महोत्सवात येणाऱ्या पर्यटकांनी अतिशय जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. त्यासाठी खास नियमावली तयार करण्यात आली आहे. – मधुमती सरदेसाई-राठोड, उपसंचालक, पर्यटन संचालनालय, नाशिक.

हेही वाचा:

The post नाशिक : काजवा महोत्सवाची पर्यटकांसाठी पर्वणी appeared first on पुढारी.