नाशिक: किकवारी येथे राकेश काकुळते यांना अखेरचा निरोप

Rakesh Kakulte

सटाणा: पुढारी वृत्तसेवा: अमर रहे…, अमर रहे…, राकेश काकुळते अमर रहे…, अशा घोषणा देत वीर जवान राकेश काकुळते यांना साश्रु नयनांनी आज (दि. १८) अखेरचा निरोप दिला. मुलगा दिव्यांश व मुलगी उन्नत्तीने पार्थिवाला अग्नीडाग देताना उपस्थित सर्वांनाच गहिवरून आले. किकवारीजवळील मोकळ्या पटांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. Rakesh Kakulte

सुरत येथे कर्तव्यावर असलेल्या राकेश काकुळते (वय ३७) यांना शनिवारी (दि.१७) हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. निधनाच्या वृत्तामुळे किकवारी व परिसरात शोककळा पसरली. निवासस्थानी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आज सकाळी सुरत येथून रुग्णवाहिकेने राकेशचे पार्थिव आणण्यात आले. यानंतर देवळाली आर्टलरी सेंटरच्या लष्करी वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. Rakesh Kakulte

यावेळी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. सुभेदार राम कीर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली येथून आलेल्या बारा लष्करी जवानांनी काकुळते यांना मानवंदना देत श्रद्धांजली अर्पण केली. तर नाशिक येथील ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक नारायण कोरडे व पोलीस हवालदार योगेश नाईक यांच्या पथकाने मानवंदना व सलामी दिली.
प्रशासनाच्या वतीने उपविभागीय प्रांत अधिकारी बबनराव काकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी पुष्पचक्र अर्पण केले. तर लष्कराच्यावतीने देवळाली आर्टलरी सेंटरचे मेजर नकुल गोस्वामी यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

येथील शेतकरी गोकुळ नामदेव काकुळते यांचा सुपुत्र असलेला राकेश २००४ मध्ये भारतीय लष्करात दाखल झाला होता. बेळगाव येथील मराठा बटालियनमध्ये खडतर प्रशिक्षण घेऊन भारतीय लष्करी सेवेत दाखल झालेल्या राकेशने जम्मू काश्मीरसह देशातील अनेक भागात देशसेवा केली होती. राकेश काकुळते यांना ४ वर्षांचा मुलगा व सहा वर्षांची मुलगी आहे.

यावेळी बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पगार, किसान मोर्चाचे बिंदू शेठ शर्मा, राहुल सोनवणे, पंकज ठाकरे, किशोर भांगडीया आदींनी वीर जवान राकेश काकुळते यांना श्रद्धांजली अर्पण केली. किकवारी ग्रामपंचायतीच्या वतीनेही राकेशच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी तालुक्यातील सामाजिक, राजकीय संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा 

The post नाशिक: किकवारी येथे राकेश काकुळते यांना अखेरचा निरोप appeared first on पुढारी.