नाशिक-पूणे सेमी हायस्पीड रेल्वे; प्रशासनाचे ‘वेट ॲण्ड वॉच’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बहुचर्चित नाशिक-पूणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गामध्ये शासनाने बदल केला आहे. नव्याने मार्गाची आखणी करताना शिर्डीमार्गे हा मार्ग पूण्याला जाेडला जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी नव्याने जमीन संपादीत करावी लागणार असली तरी आतापर्यंत संपादीत केलेल्या क्षेत्राचे काय करायचे? हे प्रश्न अनुत्तरीत आहे.

राज्याच्या सुवर्ण त्रिकोणातील दोन बिंदू असलेल्या नाशिक व पूणे या दोन शहरांना जोडणारा सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग अधिक खर्चाचा आहे. त्यामुळे त्यात बदल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा दिवसांपूर्वी नाशिकमध्ये एका कार्यक्रमामध्ये नाशिक-पूणे व्हाया शिर्डी अशी धावणार आहे. तसा नवीन प्रस्ताव केंद्रीय स्तरावर मान्यतेसाठी पाठविल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांच्या या घोषणेनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

नाशिक-पूणे रेल्वे प्रकल्पासाठी नाशिक व सिन्नर या दोन तालुक्यातील २२ गावांमधून २८७ हेक्टर क्षेत्र अधिग्रहीत करण्याची प्रक्रीया सुरू होती. त्याकरीता आवश्यक २५० कोटी रुपयांपैकी १०० कोेटींची पहिला हप्ता जिल्हा प्रशासनाला प्राप्तही झाला होता. जिल्हा प्रशासनाने या निधीमधून 45 हेक्टर क्षेत्र संपादीत करताना बाधित शेतकऱ्यांना 59 कोटी रुपयांचा मोबदलाही अदा केला. तसेच शासकीय व वनविभागाच्या जमीन संपादनासाठीही प्रक्रीया वेगाने सुरु आहे. मात्र, शासनाने आता मार्गाच बदल्याने प्रकल्पासाठी आजपर्यंत झालेल्या संपादनाचा मुद्दा कायम आहे. तसेच संबंधित शेतकऱ्यांकडून मोबदला वसूल करायचा झाल्यास अनेक अडचणींना सामाेरे जावे लागू शकते. त्यामुळे तुर्तास प्रशासनाने वेट ॲण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.

खर्च ठरणार कळीचा मुद्दा
नाशिक-पूणे शहरांदरम्यान, २३२ किलोमीटरचा दुहेरी लोहमार्ग ऊभारण्यात येणार होता. त्यासाठी १६ हजार ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र प्रकल्पातंर्गत २० स्टेशन, १८ छोटे-मोठे बोगदे, १९ उड्डाणपूल ऊभारावे लागणार आहे. हा खर्च अधिक आहे. त्यामुळे खर्चाचे कारण पुढे करत शासनाने शिर्डीमार्गे रेल्वे नेण्याचा खटाटोप सुरू केला आहे. परंतु, त्यामुळे ३३ किलोमीटरचे अंतर वाढणार असल्याने प्रवासाचा कालावधीत वाढ होईल.

तर खर्च वाचणार
नाशिक-पूणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाची वाट बदलली असताना प्रकल्पाची जबाबदारी असलेले महारेलच्या स्थानिक अधिकारी त्याबद्दल अनभिज्ञ आहेत. दरम्यान, नाशिक-पूणे हा आधीचा प्रस्ताव कायम राहून सिन्नर येथून शिर्डीसाठी समृद्धीला समांतर रेल्वेलाइन टाकल्यास शिर्डीचा प्रवास अधिक जलद होऊ शकतो. तसेच भूसंपादनासाठीच्या खर्चातही कपात होऊ शकते.

नाशिक-पूणे रेल्वेमार्गासाठी आतापर्यंत ४५ हेक्टर संपादन झाले असून ५९ कोटींचा मोबदला दिला आहे. रेल्वेमार्गातील बदलाबाबत महारेलने अद्यापही कोणतीच माहिती कळविलेली नाही. शासन जसे सूचना करेल, त्यानूसार पुढील कार्यवाही केली जाईल. – जलज शर्मा, जिल्हाधिकारी.

The post नाशिक-पूणे सेमी हायस्पीड रेल्वे; प्रशासनाचे ‘वेट ॲण्ड वॉच’ appeared first on पुढारी.