नाशिक क्राईम : नांदूरगावात एकास मारहाण

क्राईम

नांदूरगावात एकास मारहाण

नाशिक : वादाचे कारण विचारणाऱ्यास दोघांनी मिळून मारहाण केल्याची घटना नांदूरगाव येथील परफेक्ट कृषी मार्केटजवळील परिसरात घडली. या प्रकरणी शंकर गोवर्धन वाडेकर (३९, रा. नांदूरगाव) यांच्या फिर्यादीनुसार, आडगाव पोलिस ठाण्यात संशयित महेश शेडगे व अशोक शेडगे या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दोघा संशयितांनी २० मे रोजी सकाळी १०.३० वाजता शिवीगाळ करीत दगड फेकून मारल्याने दुखापत केल्याची फिर्याद आली असून, या प्रकरणी आडगाव पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल लंपास

नाशिक : गोल्फ क्लब मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळून चोरट्याने कमलेश कुमार यांच्याकडील २५ हजार रुपयांचा मोबाइल चोरून नेला. सोमवारी (दि.२९) सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

घरातून मोबाइल चोरला

नाशिक : घरात शिरून चोरट्याने मोबाइल चोरल्याची घटना २८ ते २९ मे दरम्यान गुरू गोविंदसिंग कॉलेजसमोरील घरात घडली. वैजनाथ योगाजी पठाडे (रा. इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने घरात शिरून १० हजार रुपयांचा मोबाइल चोरून नेला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस तपास करीत आहेत.

अपघातात युवक ठार

नाशिक : टेम्पोच्या चाकाखाली चिरडल्याने २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना कोटमगाव-हिंगवणे परिसरात घडली. या अपघातात आशिष जयराम वलवे (२१, रा. गंगापाडळी, लाखलगाव) याचा मृत्यू झाला. नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, संशयित टेम्पोचालक रामेश्वर विक्रम राठोड (३१, रा. देवळाली गाव) रविवारी (दि.२८) सायंकाळी ७.३० वाजता भरधाव टेम्पो चालवून आशिषच्या दुचाकीस धडक दिली. त्यात टेम्पोचे चाक आशिषच्या अंगावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस तपास करीत आहेत.

तडीपार जेरबंद

नाशिक : शहर व जिल्ह्यातून वर्षभरासाठी तडीपार केलेले असतानाही विनापरवानगी शहरात वास्तव्य करणाऱ्या गुंडास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. दीपक भिकन जगताप (२५, रा. पेठ रोड) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. दीपकला सप्टेंबर २०२२ पासून तडीपार केले आहे. तरीही तो द्वारका परिसरात आढळल्याने त्यास पकडून मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू

नाशिक : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जखमी झालेल्या जयप्रकाश जयकिसान जाजू (७८, रा. ओझर) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आडगाव दत्तमंदिराजवळील उड्डाणपूलावर १९ मे रोजी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला होता. जाजू हे ओझरहून नाशिकच्या दिशेने येताना त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, सोमवारी (दि.२९) त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक क्राईम : नांदूरगावात एकास मारहाण appeared first on पुढारी.