नाशिक क्राईम : भाडोत्री गुंडांकडून कंपनीची जागा रिकामी केली

सातपूर www.pudhari.news

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा
सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीसाठी करारांतर्गत दिलेली जागा भाडोत्री गुंडाकडून रिकामी करण्याचा प्रकार गुरुवारी (दि. 15) रात्री 10.30 च्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब गिरासे यांची सातपूर औद्योगिक वसाहतीत प्लॉट नंबर एफ 109 या ठिकाणी हर्षिता नावाची कंपनी आहे. संबंधित जागा ही संशयित केसरसिंग शेखावत याच्या मालकीची आहे. भाऊसाहेब गिरासे यांनी करारावर जागा घेतलेली असून, संशयित शेखावत हे जागा रिकामी करण्यासाठी गिरासे यांच्यावर दबाव आणत होता. शेखावत गुरुवारी रात्री 10.30 च्या सुमारास 50 ते 60 हत्यारबंद गुंडांसह कंपनीत शिरले व महिला सिक्युरिटी गार्डना धमकावत एका रूममध्ये बंद करत त्यांचे मोबाइल ताब्यात घेतले. नंतर सीसीटीव्ही व इतर साहित्याची तोडफोड करत चक्क क्रेनच्या साह्याने मशीनरी बाहेर काढली. तसेच काही मशीन व इतर वस्तू चोरून नेल्याची घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. हा प्रकार पहाटे 5 पर्यंत सुरू होता. संशयितांनी जप्त केलेले मोबाइल पहाटे 5 ला सिक्युरिटी गार्डना दिल्यानंतर त्यांनी पोलिस व कंपनीमालक गिरासे यांना याची माहिती दिली. यावेळी कंपनीमालक गिरासे यांनी त्वरित सातपूर पोलिस ठाणे गाठून याबाबतची माहिती पोलिसांना दिली. वरिष्ठ निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून हा गुन्हा सातपूर पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक क्राईम : भाडोत्री गुंडांकडून कंपनीची जागा रिकामी केली appeared first on पुढारी.