नाशिक : ‘खाकी’चे स्वप्न लवकरच साकार होणार; दिवंगतांच्या वारसांना मोठा दिलासा

पोलीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना काळापासून शहर पोलिस आयुक्तालयाच्या रखडलेल्या अनुकंपांतर्गत पोलिस शिपाई भरतीचा मार्ग मोकळा झाला असून, सन 2020 ते 2022 या तीन वर्षांतील 27 उमेदवारांची यादी आस्थापना विभागाने जाहीर केली आहे. त्यामुळे अनुकंपा भरतीसाठी पात्र ठरणार्‍या दिवंगत पोलिस कर्मचार्‍यांच्या वारसांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयुक्तालयाने प्रतीक्षा सूची तयार केल्याने या वारसदारांचे ‘खाकी’चे स्वप्न लवकरच साकार होण्याची चिन्हे आहेत.

सन 2020 पासून शहर पोलिस आयुक्तालयातील अनुकंपा भरतीचा प्रश्न प्रलंबित होता. वारस उमेदवारांच्या पाठपुराव्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांचे अनुकंपा भरतीप्रक्रिया मार्गी लावण्याचे आदेश होते. त्यानुसार आयुक्तालयानेही या भरतीची कार्यवाही तातडीने पूर्ण करत यादी जाहीर करून पुढील प्रक्रियेला सुरुवात केली आहे. 22 पुरुष, तर 5 महिला अनुकंपा पात्र उमेदवार म्हणून निश्चित केले आहेत. सन 2020 (2), 2021 (14), 2022 (11) अशा एकूण 27 उमेदवारांना पात्र ठरविले आहे. दरम्यान, आयुक्तालयाच्या प्रतीक्षा सूचीत बारावी, बी. कॉम, एम. कॉम, एम. एसस्सी, बीई. मेकॅनिक, डिप्लोमा उत्तीर्ण वारस उमेदवारांचा समावेश आहे. तर एक मुलगी व तीन मुले यांच्या वयाची व शैक्षणिक अर्हतेची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे त्यांची नावे निवड यादीत समाविष्ट करून त्यांची अर्हता पूर्ण झाल्यावर भरतीसंदर्भात प्रक्रिया करण्यात येईल. त्यामध्ये दहावीतील मुलगी, सहावीतील दोन मुले आणि आठवीतल्या एका वारस उमेदवाराचा समावेश आहे.

कार्यवाही लवकरच पूर्ण
कोरोना काळ आणि त्यानंतर पोलिस दलात कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या कर्मचार्‍यांसह अधिकार्‍यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर भरती करण्याचा निर्णय झाला आहे. प्रलंबित असलेली ही कार्यवाही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. उमेदवारांची छाती व उंची मोजमाप आणि कागदपत्रे पडताळणीचा निर्णय नंतर जाहीर होणार असल्याचे समजते.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘खाकी’चे स्वप्न लवकरच साकार होणार; दिवंगतांच्या वारसांना मोठा दिलासा appeared first on पुढारी.