नाशिक : गंगापूर धरणातून चर खोदाईसाठी ठेकेदारांची टोळी पुन्हा सक्रिय

गंगापूर धरण www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पावसाने मारलेली दांडी अन् गंगापूर धरणातील खालावलेला पाणीसाठा यांमुळे नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट गडद होताना दिसत आहे. अशात मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने धरणातून चर खोदण्याची तयारी केली होती, मात्र याकरिता अंदाजपत्रकात निधीची तरतूदच नसल्याने महासभेत या विषयाला तहकूब करण्यात आले आहे. चर खोदण्यासाठी सुमारे साडेपाच कोटींचा खर्च येणार आहे. दरम्यान, गेल्या वेळीदेखील चर खोदण्याचा घाट घालण्यात आला होता, यंदा यासाठी ठेकेदारांची टोळी सक्रिय झाल्याचा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी केला आहे.

बजेटमध्ये चर खोदण्यासाठी निधीची तरतूद नसल्याने हा विषय महासभेने तहकूब ठेवला. याबाबत निधीची तरतूद करून नव्याने हा प्रस्ताव महासभेवर ठेवला जाईल. – अविनाश धनाईत, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग मनपा.

तब्बल एक महिन्यानंतर बुधवारी (दि. २१) प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानायत यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची महासभा पार पडली. यावेळी चर खोदण्याचा विषय मांडला असता, त्यास तहकूब ठरविण्यात आले. अल निनोच्या संकटामुळे मान्सूनचे उशिरा आगमन होईल, असा सुरुवातीपासून वर्तविला जात असलेला अंदाज खरा ठरण्याची चिन्हे आहेत. जून महिना जवळपास कोरडाठाक गेला आहे. नाशिककरांची तहान भागविणार्‍या गंगापूर धरणातील जलसाठा झपाट्याने खालावत असून जुलैमध्येही वरुणराजाने अवकृपा केल्यास धरणाची पाणी पातळी 600 मीटरपेक्षाही खालावेल. धरणाच्या मध्य भागातील पाणी जॅकवेलपर्यंत येणे आवश्यक असते. पाण्याची पातळी खालावत असल्याने जॅकवेलपर्यंत येणारे पाणी कमी होते. त्यासाठी धरणाच्या मध्य भागापर्यंत चर खोदणे आवश्यक असते. त्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाने चारी खोदण्यासाठी निविदेच्या मागविण्याची तयारी केली होती. मात्र, महासभेने निधी नसल्याचे सांगत विषय तहकूब केल्याने आता पुढच्या महासभेत चर खोदण्याचा विषय पटलावर ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, गेल्या वेळीदेखील अशाच प्रकारचा चर खोदण्याचा घाट घालून ठेकेदारांचे खिसे भरण्याचा प्रकार मी उघडकीस आणला होता. आतादेखील या कामी टोळी सक्रिय झाली आहे, असे आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी केला आहे. त्यामुळे हा विषय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

माजी महापौर दशरथ पाटील www.pudhari.news
माजी महापौर दशरथ पाटील www.pudhari.news

धरणातून चर खोलवर खोदलेली असतानादेखील गेल्या चार वर्षांपूर्वी अशीच चर खोदण्याच्या नावाखाली उधळपट्टीचा डाव आखला होता. याबाबतचे फोटो तत्कालीन आयुक्तांना पाठवून सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर चर खोदण्याचा विषय संपुष्टात आला होता. आता पुन्हा एकदा याकामी ठेकेदारांची टाेळी सक्रिय झाली असून, जनतेच्या पैशांची लूट करण्याचा डाव आखला जात आहे. – दशरथ पाटील, माजी महापौर.

हेही वाचा:

The post नाशिक : गंगापूर धरणातून चर खोदाईसाठी ठेकेदारांची टोळी पुन्हा सक्रिय appeared first on पुढारी.