नाशिक : गद्दार हुरळले अन् भाजपशी जुळले-अंबादास दानवे यांची टीका

अंबादास दानवे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
‘हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या पाठी’ या म्हणीप्रमाणे गद्दार हुरळले अन् भाजपसोबत जुळले, अशी खोचक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. तसेच दोन वर्षे नव्हे तर लवकरच सरकार कोसळणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

शालिमार येथील शिवसेना भवनमध्ये शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी गटनेता विलास शिंदे, देवानंद बिरारी, सोमनाथ गायधनी आदी उपस्थित होते.

आ. दानवे म्हणाले की, ‘शिवसेनेशी गद्दारी करणार्‍यांचे काय हाल होत आहेत, हे मी दररोज डोळ्याने बघत आहे. उपमुख्यमंत्र्यांनी यांना बंगलेदेखील दिले नसल्याची टीका त्यांनी केली. गद्दारांकडून काँग्रेस, राष्ट्रवादी, हिंदुत्व हे मुद्दे पुढे केले जात असले तरी, प्रत्यक्षात यांचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धंदे बंद केल्यानेच त्यांनी अशा प्रकारचे पाऊल उचलले. आता सर्वांचे धंदे सुरू झाले असून, हे फार काळ टिकणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करताना सांगितले की, ‘सध्या आव्हाने अनेक आहेत. त्यामुळे आता काम करण्याची खरी मजा आहे. जे गद्दार गेले ते पुन्हा निवडून येणार नाहीत, याची खबरदारी प्रत्येकाने घ्यायची आहे. संभाजीनगर येथे आम्ही पुढच्या निवडणुकीत गद्दारांना जागा दाखवून देऊ, नाशिकमध्ये देखील महापालिका, जि. प. निवडणुकीत शिवसेनेची ताकद दाखविण्याचे अवाहन त्यांनी केले.

‘शिंदे’ आडनाव अन् विस्मरण
शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते यांनी मनोगत व्यक्त करताना सर्व नेत्यांची नावे घेतली. मात्र, विलास शिंदे यांचे नावे घेताना त्यांना विस्मरण झाले. त्यांनी ‘आमचे मित्र’ असे म्हणत विलास शिंदे यांचे नाव घेण्यासाठी बराच वेळ घेतला. तेव्हा विलास शिंदे यांनीच त्यांना नाव सांगून आठवण करून दिली. तेव्हा ‘शिंदे’ आडनावामुळे थोडासा गोंधळ झाल्याचे सांगताच सभागृहात हशा पिकला.

न्यायालयाचा निकाल आपल्याच बाजूने
न्यायालयात तब्बल पाच वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी सुरू असून, न्यायालयाचा निकाल आपल्याच बाजूने लागणार असल्याचा दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास असून, पाचपैकी एका जरी प्रकरणात आपल्या बाजूने निकाल लागल्यास, शिवसेनेचा विजय होईल, असेही दानवे यांनी यावेळी सांगितले.

अन् विरोधी पक्षनेता झालो
विरोधी पक्षनेतेपदी झालेल्या निवडीबद्दल दानवे यांनी सांगितले की, एके दिवशी उद्धव ठाकरे यांनी मला बोलावले अन् हातात एक पत्र टेकवले. त्यांनी हे पत्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्याकडे घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार मी ते पत्र घेऊन गेलो. नीलम गोर्‍हे यांनी पत्र बघून तुम्ही हे पत्र वाचले काय? अशी मला विचारणा केली. तेव्हा मी नाही असे बोललो. तेव्हा त्यांनी पक्षाकडून विरोधी पक्षनेता म्हणून तुमच्या नावाची या पत्रात शिफारस केल्याचे सांगितले. तेव्हा मला माझी विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाल्याचे कळाले. निवड झाल्यापासून एकदाही मी विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीत बसलो नाही. कारण उद्धव ठाकरे यांनी या खुर्चीत आपल्याला बसायचे नसल्याचे सांगितले. त्यांच्या सांगण्याचे दोन अर्थ आहेत, एक म्हणजे जनतेची कामे करण्यासाठी बाहेर पडावे व दुसरे म्हणजे विरोधात नव्हे तर सत्तेत जाण्यासाठी प्रयत्न करावेत.

हेही वाचा :

The post नाशिक : गद्दार हुरळले अन् भाजपशी जुळले-अंबादास दानवे यांची टीका appeared first on पुढारी.