नाशिक : गोदाघाट परिसरातून ६ टन कचरा संकलित

panchvati www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

छठपर्वानिमित्त गोदाघाट परिसरात रविवारी (दि. ३०) उत्तर भारतीयांची गर्दी उसळली होती. या छठपूजेनंतर गोदाघाट परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. दै. “पुढारी’ने यासंदर्भात मंगळवारी (दि.१) छायावृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या मनपा घनकचरा व्यवस्थापन विभाग व छठपूजा समितीचे कार्यकर्ते व वॉटर ग्रेस कंपनीचे कर्मचारी यांनी होळकर पूल ते गौरी पटांगणापर्यंतच्या भागात पडलेला ६ टन १०५ किलो कचरा संकलित करण्यात आला. हा कचरा घंटागाड्यांतून पाथर्डीच्या खतप्रकल्पावर नेण्यात आला. 

छठपूजेनंतर पूजा साहित्य व निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्य कलशाचा वापर करा, नदी परिसरात प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर, नदीत निर्माल्य, फुले, हार, कपडे टाकू नये अशा प्रकारच्या सूचना महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून भाविकांना देण्यात आल्या होत्या. त्याचे काही प्रमाणात पालन करण्यात आले. मात्र, तरीही होळकर पुलाखालील भाग, रामकुंड, गांधी तलाव, नीलकंठेश्वर महादेव मंदिर, जुना भाजीबाजार, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, कपुरथळा, रोकडोबा मैदान, कपिला संगम, नांदूरघाट या परिसरात छठपूजेनंतर मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला होता.

गोदाघाटाच्या परिसरातील हा कचरा ५५ कर्मचाऱ्यांमार्फत जमा करण्यात आला. तसेच कपिला संगम व नांदूरघाट येथे घनकचरा विभागाच्या ५८ कर्मचाऱ्यांनी परिसर स्वच्छ केला. हा कचरा घंटागाड्यांतून पाथर्डीच्या खतप्रकल्पावर नेण्यात आला. विभागीय अधिकारी कैलास राभडिया, घनकचरा व्यवस्थापनचे विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. श्री संत गाडगे महाराज कनोजिया धोबी समाज संस्थेचे संस्थापक सुरेश कनोजिया, व्यवस्थापक राजू कनोजिया व त्यांचे १२ स्वयंसेवक यांनी गंगाघाट परिसरातील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी दीपक चव्हाण, नंदू गवळी, अनिल नेटावटे, बाळू जगताप, बी. के. पवार, चंद्रशेखर साबले, विलास नाइकवाडे, कृष्णा शिंदे, संजय जाधव हेदेखील स्वच्छता माेहिमेत सहभागी झाले होते.

हेही वाचा:

The post नाशिक : गोदाघाट परिसरातून ६ टन कचरा संकलित appeared first on पुढारी.