नाशिक : चांदवड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपविरोधात आघाडीचे रणशिंग

चांदवड बाजार समिती निवडणूक,www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीतून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला पायउतार करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरे गटाने एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली आहे. यामुळे बाजार समितीची निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारल्यास आगामी सर्वच निवडणुका भाजपसाठी कसोटीच्या ठरणार आहेत.

चांदवड बाजार समितीच्या एकूण १८ जागांसाठी निवडणूक घेतली जात आहे. या निवडणुकीत स्वतःचे स्वप्न अजमावण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली आहे. चांदवड बाजार समितीची सत्ता २० वर्षांपासून माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्याकडे एकहाती असल्याने त्यांचे बाजार समितीवर नेहमी वर्चस्व बघावयास मिळाले आहे. मात्र, मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर, माजी सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे व शिवसेनेचे नितीन आहेर यांनी एकत्र निवडणूक लढवीत कोतवालांची सत्ता काबीज करीत भाजप– सेनेने बाजार समितीवर पहिल्यांदा झेंडा फडकवला होता. या पराभवामुळे कोतवालांना नाही म्हटले तरी मतदारांनी मोठा धक्का दिला होता. गेल्या पाच ते सहा वर्षांत बाजार समितीच्या विरोधी बाकावर असतानादेखील माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी बाजार समितीच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांनी वेळोवेळी सहकार्याची भूमिका निभावली आहे.

मागील बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत सध्याची परिस्थिती विपरीत आहे. सध्या, राज्यात भाजप पक्षाविरोधात राष्ट्रवादी, काँग्रेस व ठाकरे गटाची शिवसेना या तिन्ही राजकीय पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली आहे. आजच्या मितीला भाजपचे आमदार, खासदार, राज्यात व केंद्रात सरकार असल्याने तालुक्यात सर्वाधिक मजबूत राजकीय पक्ष म्हणून भाजपकडे पाहिले जात आहे. काँग्रेसचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, राष्ट्रवादीचे माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन आहेर, तालुकाध्यक्ष संजय जाधव, तालुकाप्रमुख विलास भवर, माजी जिल्हा परिषद सदस्य कारभारी आहेर यांचे व्यक्तिगत सर्वच राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संबंध असल्याने महाविकास आघाडीदेखील अधिक मजबूत दिसत आहे. यामुळे या निवडणुकीत मतदार राजा कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतो अन बाजार समितीची सत्ता सुपूर्द करतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

निंबाळकरांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर हेदेखील अपक्ष उमेदवारी करीत आहे. निंबाळकर यांनी गेल्या ८ ते ९ वर्षांत बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात वेळोवेळी वाचा फोडली आहे. यामुळे बराचसा मतदार वर्ग हा निंबाळकरांकडे आकर्षित झाल्याचे चित्र आहे. यामुळेच निंबाळकर यांना आपल्या सोबत घेण्यासाठी भाजप व महाविकास आघाडीचे नेतेमंडळी प्रयत्न करताना दिसत आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : चांदवड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपविरोधात आघाडीचे रणशिंग appeared first on पुढारी.