नाशिक : छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करा; सकल मराठा समाजाची मागणी

वणी pdhari.news

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा

वणी येथे छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने वणी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

नगर येथे झालेल्या ओबीसी मेळाव्यात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या बाबतीत बोलतांना दोन समाजात तेढ निर्माण करणारे बेताल वक्तव्य केल्याचा आरोप दिंडोरी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला असून त्याचा निषेध व्यक्त करीत मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वणी पोलिसांत निवेदन देऊन करण्यात आली आहे.

नगर येथे ओबीसी समाजाचा मेळावा झाला. त्यात मंत्री भुजबळ यांच्या भाषणाची व्हिडीओ क्लिप समाज माध्यमातून व्हायरल झाली आहे. या भाषणात केलेल्या चुकीच्या वक्तव्याने वणी परिसरातील मराठा समाज बांधव एकत्रीत येत वणी पोलीस ठाण्यात छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी निवेदन देण्यात आले. संविधानीक पदावर असलेल्या व्यक्तीने असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. त्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी भुमिका यावेळी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले या आशयाचे निवेदन वणी पोलीस ठाण्याचे पो. उप. निरीक्षक विजयकुमार कोठावळे यांच्याकडे देण्यात आले. कोठावळे यांनी निवेदन देण्यात साठी आलेल्या मराठा बांधवांना सांगीतले की, वरिष्ठांशी या बाबत चर्चा करतो. वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करू. भुजबळांवर गुन्हा दाखल केला नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे वणी परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर केले आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, आखिल भारतीय मराठा महासंघाचे बाळासाहेब घडवजे, गंगाधर निखाडे, देशमुख, ॲड. विलास निरघुडे, सचिन कड, राजेंद्र महाले व मराठा समाज बांधव उपस्थित होते.

The post नाशिक : छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करा; सकल मराठा समाजाची मागणी appeared first on पुढारी.