नाशिक जिल्ह्यातील चार तालुक्यांना भूस्खलनाचा धोका

भूकंप धक्के नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पाऊस, भूकंप, अतिपर्जन्य, डोंगर कापले जाणे अशा विविध कारणांमुळे जिल्ह्यावर भूस्खलनाचे संकट घाेंगावते आहे. नाशिकची काझीगढी व सप्तश्रृंगगड यासह चार तालुक्यांतील तब्बल ४३ ठिकाणांना भूस्खलनाचा धोका आहे. जिल्हा प्रशासन लवकरच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या (एनडीआरएफ) मदतीने या सर्व ठिकाणी जनजागृती मोहीम हाती घेणार आहे.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) अहवालानुसार २००० ते २०१२ या कालावधीत महाराष्ट्रात ५ हजार ११२ भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. इस्त्रोच्या लँडस्लाइड ॲटलास ऑफ इंडिया या अहवालामधून ही धक्कादायक माहिती उजेडात आली. याच अहवालात देशातील भूस्खलनप्रवण १४७ जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करताना त्यांना अलर्ट जाहीर केला आहे. त्यामध्ये राज्यातील ११ जिल्ह्यांचा समावेश असून, या यादीत नाशिक १२८ व्या क्रमांकावर आहे. इस्त्रोच्या अहवालानंतर जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाली आहे.

प्रशासनाने तयार केलेल्या आपत्ती व्यवस्थापन निवारण अहवालानुसार जिल्ह्यात नाशिक, पेठ, सुरगाणा व कळवण या चार तालुक्यांना भूस्खलनाचा सर्वाधिक धोका आहे. या सर्व ठिकाणी ४३ गावे व पाडे हे भूस्खलनप्रवण क्षेत्रात येत आहे. एकट्या कळवण तालुक्यातील ३० ठिकाणांचा त्यात समावेश आहे. भूकंप, पाऊस, अतिवृष्टी व अन्य आपत्तींचा धाेका लक्षात घेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संभाव्य उपाययोजना राबविणार आहे. तसेच एनडीआरएफच्या मदतीने तेथील स्थानिक जनतेमध्ये जनजागृती केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दर पावसाळ्यात स्थलांतर

मान्सूनचा धोका लक्षात घेत जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी भूस्खलनप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे पावसाळ्यापूर्वी स्थलांतरण केले जाते. नाशिकमधील काझीगढी भागातील जनतेला महापालिका नोटीस बजावते. दोन वर्षांपूर्वी सुरगाण्यातील काही गावांमध्ये जमिनीला भेगा गेल्या होत्या. त्या वेळी प्रशासनाने तातडीने तेथील लोकांना स्थलांतरित केले. त्र्यंबकेश्वरमधील मेटघर किल्ला परिसरातही भूस्खलनाचा धोका आहे.

भूस्खलन का होेते?

राज्यातील नाशिकसोबत ठाणे, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नगर, कोल्हापूर, सातारा, मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे भूस्खलनप्रवण क्षेत्रात येतात. भूस्खलन ही नैसर्गिक घटना आहे. अतिपाऊस, पूरपरिस्थिती, उत्खनन, डाेंगरउतार कापणे, भूकंप, बर्फ वितळणे, खोदकाम व मोठ्या प्रमाणात विकासकामे ही भूस्खलनाची कारणे आहेत.

भूस्खलनप्रवण भाग

नाशिक : काझीगढी.

पेठ : सदडपाडा, बिलक्स, बेहेडपाडा, गोडसपाडा, देवरपाडा, कासारविहीर, जांबळे.

दिंडोरी : रडतोंडी, अवंतवाडी, चंडिकापूर, सूर्यगड, पिंपराज.

कळवण : मंगळदार, तातीणपाडा, जमाळे, कोसुर्डे, भावकुर्डे, कार्भेळ, देसगाव, गांडूळमोकपाडा, तिरळ, आमदार, दिंगामे, खर्डेदिगर, उंबरगव्हाण, चिंचोळमाळ, हनुमंतमळा, महाल, पायरपाडा, कठारे दिगर, बिऱ्हडवात, दरेगाव, वणी, मोहनदरी, नांदूर, सप्तश्रृंगगड, महेदर, मुकणे वणी, वडाळे, पिंपरी मरकड, कटाळगाव, पाळेपिंपरी, माची धोडप.

The post नाशिक जिल्ह्यातील चार तालुक्यांना भूस्खलनाचा धोका appeared first on पुढारी.