नाशिक : बिल्वतीर्थ तलाव, नीलपर्वतावर बिबट्यांचा ‘मॉर्निंग वॉक’

बिबट्या

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर शहराच्या उत्तरेस असलेला बिल्वतीर्थ तलाव, नीलपर्वत या परिसरात सायंकाळी उशिरा तसेच पहाटे बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगर परिषद प्रशासन तातडीने बंद पथदीप सुरू करण्यासाठी कामाला लागले आहे. तर वनखात्याने पिंजरे मागितले असून, ते नीलपर्वत परिसरात ठेवले जाणार आहे.

गत तीन महिन्यांत बिबट्याने तीन बालकांना झडप घालत ठार केल्याच्या घटना धुमोडी, वेळुंजे आणि ब्राह्मणवाडे येथे घडली. त्यापूर्वी दुगारवाडीजवळ दोन वेळा लहान बालकांवर हल्ला झाला. या घटनांनी जनमाणसात भीती निर्माण झाली आहे. बिल्वतीर्थ परिसरातील वस्तीत बिबट्या खुलेआम येत आहे. कोंबड्या, कुत्री उचलून तो घेऊन जात आहे.

वन विभागाकडून ब्रह्मगिरीच्या पश्चिम बाजूला बिबटे आणून सोडले जातात. त्या भागात झाडी विरळ झाली आहेत. फार्महाउस उभे राहिल्याने जागोजागी विद्युत दिव्यांच्या झगमगाटाने बिबटे आणि अन्य वन्यप्राणी लग्नस्तंभाच्या टेकडीच्या बाजूने बिल्वतीर्थ तलाव व नीलपर्वताकडे येऊ लागले आहेत. नीलपर्वत येथे पहाटे आणि सायंकाळी दर्शनासाठी भाविकांचा राबता असतो. रिंगरोडने सायंकाळी आणि पहाटे फिरायला जाणारे नागरिकही असतात. त्यांच्यामध्ये भीती निर्माण झाली आहे.

जव्हार रस्ता आणि परिसरात असलेले पोल्ट्री व्यावसायिक मृत कोंबड्या जवळच फेकतात त्याच्या वासाने बिबट्या येत असल्याचे बोलले जाते. तसेच जव्हार रस्त्याच्या बाजूने मासे, मटण विक्री करणारे व्यावसायिक, हॉटेल, धाबेचालक त्यांच्या दुकानातील कचरा बाजूस फेकतात. त्याच्या वासाने तरस, कुत्री जमा होतात व त्यामुळेदेखील बिबट्यांचा वावर वाढला आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : बिल्वतीर्थ तलाव, नीलपर्वतावर बिबट्यांचा 'मॉर्निंग वॉक' appeared first on पुढारी.