नाशिक : जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी ९० टक्के मतदान, आज मतमोजणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी रविवारी (दि. ५) झालेल्या मतदानावेळी ग्रामस्थांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. निवडणुकीत तब्बल ९० टक्के मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावताना उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएमबंद केले. सोमवारी (दि. ६) तहसील कार्यालयांमध्ये मतमोजणी पार पडणार आहे.

आगामी लोकसभेपूर्वीची सेमिफायनल म्हणून ग्रामपंचायत निवडणुकांकडे पाहिले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व आले आहे. जिल्ह्यात ४५ ग्रामपंचायतींमधील 200 जागांसाठी घेण्यात आलेल्या मतदानाला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला. सकाळी 7.30 पासून मतदान केंद्रांसमोर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी 7.30 ते दुपारी 1.30 या कालावधीत तब्बल ३० टक्के ग्रामस्थांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. दुपारच्या सत्रात मतदानाचा वेग काहीसा मंदावला होता. अखेरच्या टप्प्यात उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी घरोघरी जाऊन आवाहन केल्यानंतर गावकरी मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडले. त्यामुळे सायंकाळी 5.30 ला मतदानाची वेळ संपुष्टात येऊनही अनेक ठिकाणी रांगा लागलेल्या होत्या. एकूण ६६ हजार ८०० ग्रामस्थांपैकी सुमारे ९० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

सार्वत्रिक निवडणुकांबरोबरच १९ ग्रामपंचायतींमधील सदस्यांच्या १९ व थेट सरपंचाच्या तीन अशा एकूण २२ रिक्तपदांसाठी मतदान घेण्यात आले. पोटनिवडणुकांनाही मतदारांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून, सुमारे ९० मतदान पार पडले. दरम्यान, तहसील कार्यालयांमध्ये सकाळी १० पासून मतमोजणी होणार असून एक ते दोन तासांमध्ये सर्व निकाल हाती येतील. त्यामुळे दिवाळीपूर्वी कोणाच्या विजयाचे फटाके उडणार आणि कोणाला मात मिळणार हे अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार असल्याने साऱ्यांच्याच नजरा मतमोजणीकडे लागून राहिल्या आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी ९० टक्के मतदान, आज मतमोजणी appeared first on पुढारी.