नाशिक जिल्ह्यात जूनअखेरीस मोठा पाऊस : हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख

मुसळधार पाऊस

नाशिक (सिन्नर) पुढारी वृत्तसेवा 

नाशिक जिल्ह्यात १३ जूनला दिवसभर ढगाळ वातावरण राहील तर सायंकाळनंतर पावसाचे आगमन होणार आहे. १६ जूनपर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला.

सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर स्वामी समर्थ केंद्र कारवाडीचे संतोष जाधव, तालुका कृषी अधिकारी नंदकिशोर अहिरे, भगवान जाधव, शिवाजी दळवी, संदीप दळवी, सचिन दळवी, रमेश पांगारकर, रामभाऊ जाधव, राजेंद्र बडगुजर, शिवाजी पाटील, संतोष काळे, कल्पेश पटेल, संतोष ललवाणी, विजय खैरनार, राजेंद्र देशमुख उपस्थित होते.

पुढे बोलताना पंजाबराव डख यांनी २७ जून ते एक जुलैपर्यंत भरपूर पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करत सर्वत्र पाणीच पाणी होणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता साधारण २२ इंच ओल आल्यानंतर पेरणी करण्याचा सल्ला दिला. वेळप्रसंगी शेतकऱ्यांना शेतातील पाणी काढून देण्यासाठी शेतात चर खोदावे लागणार असल्याचे म्हणाले. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी पिकाचे उत्पन्न किती झाले यासाठीचा अंदाज कसा बांधावा याबाबतही उदाहरणासह माहिती दिली.

संजय पिराजी लोंढे, संजय कारभारी पगार या उत्कृष्ट शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी बाळासाहेब पगार, आत्माराम पगार, रभाजी पगार, केदूनाना पगार, कृष्णा घुमरे, संजय वारुळे आदींससह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. मेळाव्याच्या ठिकाणी शेतोपयोगी विविध स्टॉल लावण्यात आले होते.

तेथे शेतकऱ्यांनी शेतीसंबंधी माहिती घेत शेतोपयोगी वस्तू खरेदी केल्या. शेतकरी मेळाव्याचे आयोजक समर्थ कृषी सेवा केंद्राचे संचालक सचिन दळवी, संदीप दळवी यांच्या कृषी केंद्रास हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख, स्वामी सेवा केंद्राचे संतोष जाधव, कृषी अधिकारी नंदकिशोर अहिरे आदींनी भेट देत कृषी सेवा केंद्र शेतकऱ्यांना पुरवत असलेल्या सेवेचे कौतुक केले.

पशू-पक्ष्यांकडून पावसाचा अंदाज

अल निनो वादळाचा प्रभाव डिसेंबर महिन्यात होत असल्याने महाराष्ट्रात पेरणी काळात त्याचा प्रभाव पडणार नाही. जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये भरपूर पाऊस पडणार आहे. शेतकरी निसर्ग, पशु-पक्षी, प्राणी यांच्याकडूनही पावसाचा अंदाज घेऊ शकतात याबाबत उदाहरणासह माहिती दिली.

हेही वाचा : 

The post नाशिक जिल्ह्यात जूनअखेरीस मोठा पाऊस : हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख appeared first on पुढारी.