नाशिक : जिल्ह्यात दोन दिवसांत चार हजार नवमतदार नोंदणी

मतदार www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्हा निवडणूक शाखेतर्फे १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये २५ व २६ रोजी विशेष मतदार नोंदणी मोहिमेअंतर्गत ३ हजार ९५९ नवमतदारांची नोंदणी करण्यात आली. तसेच २ हजार १५८ मतदारांची नावे यादीतून वगळताना ८८२ मतदारांच्या नाव आणि पत्त्यात दुरुस्ती केली.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयादीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत दोन दिवस निवडणूक शाखेकडून जिल्हाभरात विशेष मोहीम राबविली. प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलओ हे मतदारयादी तसेच विविध अर्जांसह उपस्थित होते. जिल्ह्यात शनिवारी (दि.२५) दिवसभरात एकूण ३०३२ अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले. त्यामध्ये १८ ते १९ वयोगटातील ७१६, तर १९ वर्षांवरील १०६३ मतदारांनी नोंदणी केली. मृत व दुबार नावे यादीतून वगळण्यासाठी ८६० अर्ज आले असून, ३९३ मतदारांनी नाव-पत्त्यात दुरुस्तीसाठी अर्ज केले. तसेच ५ नवीन दिव्यांगांनी यादीत नाव समाविष्ट केले असून, १२ जणांनी दुरुस्तीसाठी अर्ज भरले.

विशेष मोहिमेमध्ये रविवारी (दि.२६) १८ ते १९ या वयोगटातील ७०० युवकांची नोंदणी केली. १९ वयोगटावरील १४८० मतदारांनी नोंदणीसाठी अर्ज केले. तर मृत व दुबार नावांच्या वगळणीसाठी १०९५ अर्ज अर्ज आले आहेत. नाव व पत्त्यामधील दुरुस्तीसाठी ४८९ अर्ज प्राप्त असून, एकूण ३६४९ अर्ज प्रशासनाकडे आले. यावेळी प्रत्येकी ८ दिव्यांगांनी नवमतदार नोंदणी व दुरुस्तीसाठी अर्ज सादर केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

अल्प प्रतिसाद

जिल्ह्याला मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा तडाखा विशेष माेहिमेला बसला. त्यामुळे मतदान केंद्राकडे मतदार फिरकले नाहीत. तर काही केंद्रांवर दुपारनंतर बीएलओ गायब असल्याचे चित्र होते. दरम्यान, दोन दिवसांतील प्राप्त अर्जांची पडताळणी करत त्याचा डाटा आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड केला जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्ह्यात दोन दिवसांत चार हजार नवमतदार नोंदणी appeared first on पुढारी.