Nashik News : शहराची लोकसंख्या 22 लाख; नाट्यगृह अवघे दोनच

कालिदास कलामंदिर, पसा नाट्यगृह,www.pudhari.news

नाशिक : दीपिका वाघ

कला मग ती कोणतीही असो.. गायन, वादन, अभिनय, नृत्य कला माणसाला वाईट वृत्तीपासून परावृत्त करून चांगला माणूस घडविण्याचे मोठे काम करते. कोणत्याही शहराची प्रगती शहरात राबविल्या जाणाऱ्या सांस्कृतिक घडामोडींवर अवलंबून असते. सध्या शहरात ज्या गतीने गुन्हेगारीत वाढ होते त्या तुलनेने शहरातील सांस्कृतिक चळवळीला बकालपणा आला आहे. सुमारे 22 लाखहुन अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरात केवळ कालिदास कलामंदिर, परशुराम साईखेडकर दोनच नाट्यगृह असल्याने ही खरी शोकांतिका आहे.

सिडको, नाशिकरोड, सातपूरसारख्या भागात राहणाऱ्या नागरिकांना व्यासपीठ मिळत नसल्याने परिणामी नाट्यगृहांची सोयच नसल्याने या भागात सांस्कृतिक प्रगती झाली नाही. पंचवटीतील पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर सभागृहात महानगरपालिका स्मार्ट सिटीने दोन कोटी खर्चून सभागृहाचे नूतनीकरण केले, पण नाट्यगृहाचा पडदा अद्यापही न उघडल्याने पंचवटीतील भाग सांस्कृतिक चळवळीपासून वंचित आहे. दादासाहेब गायकवाड सभागृह नूतनीकरणासाठी मनपाने ताब्यात घेतल्याने तिथे कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम सध्या होत नाही. नाशिकरोडला बिटको चाैकाजवळ कोठारी नाट्यगृह उभारले जाणार होते त्यालाही अद्याप मुहूर्त मिळाला नाही. नाशिकरोड, दसक, पंचक, एकलहरे भाग जोडला गेला आहे; परंतु येथील नागरिकांना नाट्यगृहाची कोणतीही सोय नाही.

प. सा. नाट्यगृह नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत

पसा नाट्यगृह शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने प्रेक्षकांना येण्यासाठी सोयीस्कर ठरते; परंतु नाट्यगृहात अनेक सुविधांची वाणवा असल्याने आहे त्यात समाधान मानून तिथे कलाकारांना प्रयोग करावे लागतात. नूतनीकरणाबाबत रंगकर्मींच्या रंगभूमी दिनाच्या दिवशी बैठक घेण्यात आली. अंदाजे तीन कोटी खर्च अपेक्षित असून, निधी मिळेपर्यंत वाट बघावी लागणार आहे.

ज्या ठिकाणी प्रेक्षकांना येणे-जाणे सोयीचे असते त्याच ठिकाणी नाट्यगृह उभारणे गरजेचे असते. आडगावसारख्या ठिकाणी नाट्यगृह बांधले तर तिथपर्यंत प्रेक्षक येतील का? नाटकाचे सेट, लाइट्स, साउंड सिस्टीम तसेच भाडे या सुविधा ज्या नाट्यगृहात चांगल्या मिळतात तिथेच प्रेक्षक आणि नाट्यसंस्था प्रयोग करण्यास पसंती देतात.

– राजेश जाधव, समन्वयक, राज्य नाट्य स्पर्धा

शहरात किमान चार नाट्यगृहे अपेक्षित आहेत. शासनाकडून खेळाला जेवढे प्राधान्य दिले जाते तेवढे महत्त्व नाट्यक्षेत्राला देत नाही. जो निधी मंजूर केला जातो तो केवळ कागदावरच राहतो. दुर्दैवाने नाट्यक्षेत्र गौण मानले जाते. शालेय, महाविद्यालयीन स्तरावर नाटकाचे संस्कार झाले तर त्या कलाकारात आत्मविश्र्वास निर्माण होतो. पर्यायाने शहरात गुन्हेगारीचे प्रमाणात घट होते.

– प्रा. रवींद्र कदम, अध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य परिषद

५० कोटींचा निधी, ७५ नाट्यगृहांचे नूतनीकरण

शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात राज्यातील नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी ५० कोटी निधी मंजूर करण्यात आला तर, राज्य नाट्य स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी स्पर्धेला शुभेच्छा देताना सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येत्या दोन वर्षांत राज्यात ७५ नाट्यगृहांचे नूतनीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

The post Nashik News : शहराची लोकसंख्या 22 लाख; नाट्यगृह अवघे दोनच appeared first on पुढारी.