नाशिक : जिल्ह्यात ‘या’ 17 मार्गांवर पावसामुळे एसटी बंद

एसटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसामुळे अनेक ठिकाणी पूल व रस्ते पाण्याखाली गेल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव राज्य परिवहन महामंडळाने काही भागातील प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी 17 मार्गांवर एसटी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामध्ये कळवण-पेठ-सुरगाणा आदी भागांतील सर्वाधिक मार्गांचा समावेश आहे.

मुसळधार पावसामुळे दोन दिवसांपूर्वी सापुतारा घाटात दरड कोसळली होती. त्यामुळे नाशिक -सुरत महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. सुरतवरून येणारी वाहने सुरगाणामार्गे वळवण्यात आली आहेत. तसेच नाशिक-राक्षसभुवन मार्गावरील ननाशीपासून वाहतूक बंद आहे. नाशिक-बालापाडा मार्गावर शिरगावपासून बंद करण्यात आली आहे. नाशिक-बाफणविहीर, नाशिक-वांगण (पळसन), नाशिक-केळवण (हस्ते फाटा), त्र्यंबकेश्वर-फणसपाडा, त्र्यंबकेश्वर-वरसविहीर, नाशिक-करंजूल या मार्गावर एसटी प्रवासी वाहतूक ठप्प आहे.

सटाणा-मानूर मार्गावर अलियाबादपासून पुढील वाहतूक बंद करण्यात आली आहे. लासलगाव-सिन्नर रस्ता नांदूरमध्यमेश्वरपासून तर कळवण-डांगसौंदाणे मार्ग मळगाव फाट्यापासून पुढील वाहतूक बंद झाली आहे. कळवण-जयदर मार्ग भांडणेपासून बंद ठेवण्यात आला आहे. सुरगाणा-बर्डीपाडा रस्ता उंबरठाणपासून पुढील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पेठ-बार्‍हे, पेठ-जाहुले तर पेठ-शेपुझरी हे मार्ग म्हसगणपासून पुढील वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. दरम्यान, पावसाचा जोर कमी झाल्यानंतर प्रवासी वाहतूक सेवा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे एसटीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

आगारनिहाय बंद मार्ग
आगार              मार्ग
नाशिक(1)          04
नाशिक (2)         05
कळवण             03
पेठ                   03
सटाणा              01
लासलगाव         01

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्ह्यात 'या' 17 मार्गांवर पावसामुळे एसटी बंद appeared first on पुढारी.