नाशिक जिल्ह्यात वाढतोय नवमतदारांचा टक्का

मतदार www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्हाभरात मतदार नोंदणीला नवयुवकांचा चांगला प्रतिसाद लाभतो आहे. जिल्ह्यातील १८ व १९ वयोगटामधील २८ हजार २२९ युवकांनी मतदारयादीत नावनोंदणीसाठी अर्ज केल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेने दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा निवडणूक शाखेने तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मतदार याद्या पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. गेल्या २७ सप्टेंबरला प्रारूप याद्यांची प्रसिद्धी करताना अधिकाधिक नवमतदारांच्या नावनोंदणीवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. नाशिक शहर व ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये जनजागृतीवर भर दिला जात आहे. त्यामध्ये अधिकधिक युवकांना मतदारयादीत नावनोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नांना यश मिळते आहे.

जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांतून २८ हजार २२९ नवमतदारांनी यादीत पहिल्यांदाच नाव नोंदणीसाठी अर्ज केले आहे. त्यामध्ये २७ हजार २८२ अर्ज हे आॅनलाइन दाखल झाले असून, उर्वरित ९४७ अर्ज हे युवकांनी समक्ष येऊन सादर केली आहेत. दाखल अर्जांची निवडणूक शाखेकडून छाननी केल्यानंतर डाटा हे आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड केला जात आहे. दरम्यान, ५ जानेवारीला अंतिम मतदारयादीची प्रसिद्धी केली जाणार आहे. तत्पूर्वी नवमतदारांचा लाखांचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून निवडणूक शाखा कामाला लागली आहे.

दीड लाख अर्ज

मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत नवीन नावनोंदणीसह मतदारयादीत दुबार व मयतांची नावे वगळण्यात येत आहेत. तसेच मतदारांना त्यांच्या नाव व पत्त्यात दुरुस्तीसाठी अर्ज करण्याची संधी आहे. त्यानुसार सर्व प्रकारचे एकूण १ लाख ५८ हजार ६४६ अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले. त्या पैकी १ लाख ३८ हजार १७० अर्ज छाननीनंतर स्वीकारण्यात आली. तर त्रुटी असलेली १९८८१ अर्ज बाद ठरविली असून, प्रशासनाकडे केवळ ५९५ अर्ज प्रलंबित आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक जिल्ह्यात वाढतोय नवमतदारांचा टक्का appeared first on पुढारी.