सीपीआरआय: रस्त्याअभावी इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे रखडले उद्घाटन

सीपीआरआय pudhari.news

नाशिक : सतीश डोंगरे

११५ कोटी रुपये खर्चून १४० एकरवर उभारण्यात आलेली सीपीआरआयची (Central Power Research Institute) शिलापूर येथील इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब केवळ अधिकाऱ्यांच्या उफराट्या कारभारामुळे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. वास्तविक, या लॅबचे उद्घाटन गेल्या डिसेंबर महिन्यातच केले जाणार होते. मात्र, लॅबपर्यंत अवजड वाहने येण्या-जाण्यासाठीचा केवळ अडीच किलोमीटरचा मोठा रस्ताच केला नसल्याची बाब अधिकारी व संबंधितांच्या लक्षात आल्यानंतर लॅबचे उद्घाटन रखडले आहे. सध्या लॅबपर्यंत बैलगाडी जाऊ शकेल एवढाच जेमतेम रस्ता आहे. (केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थान – सीपीआरआय)

इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये या उद्योगांची उत्पादने प्रमाणित करण्यासाठी इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब असावी, अशी मागणी उद्योजकांकडून सातत्याने केली जात होती. सद्यस्थितीत या उद्योगांना त्यांची उत्पादने प्रमाणित करण्यासाठी सीपीआरआयच्या भोपाळ किंवा बंगळुरू येथील टेस्टिंग लॅबला पाठवावी लागतात. त्यासाठी खर्च आणि वेळेचा अपव्यय होतो. त्याचमुळे निमा पॉवर प्रदर्शनातून नाशिकमध्ये ही लॅब असावी, अशी मागणी झाली होती. त्यानंतर केंद्र व राज्य सरकारच्या ११५ कोटी रुपयांच्या निधीतून व सहयोगातून शिलापूर येथे १४० एकरवर ही लॅब उभारण्यात आली. वास्तविक, १८ महिन्यांत ही लॅब कार्यान्वित होणे अपेक्षित होते. मात्र पाच वर्षांनंतरही लॅब उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. आता तर अचंबित करणारे कारण समोर येत आहे. लॅबपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशस्त डांबरी रस्ता नसल्याचे कारण सांंगितले जात आहे. अगोदरच लॅब कार्यान्वित करण्यासाठी उशीर झाला. त्यात जेमतेम अडीच किलोमीटर रस्ता उभारला नसल्याची बाब समोर येत असल्याने, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमधील ‘कनेक्ट’, तर आऊट ऑफ रेंज झाला नाही ना? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. (Central Power Research Institute)

पहिल्या टप्प्यात या तपासण्या
लॅबमधून पहिल्या टप्प्यात एनर्जी मीटर, टेम्परेचर राइज ट्रान्स्फॉर्मर आणि टेस्ट फॉर ट्रान्स्फाॅर्मर या तीन तपासणी केल्या जाणार आहेत. तसेच जुलै किंवा ऑगस्ट २०२४ मध्ये शाॅट सर्किट, इम्पल्स व्हाेल्टेज टेस्ट आणि ईएमआय ईएमसी टेस्ट या तीन तपासण्या सुरू केल्या जाणार असल्याची माहिती दिली जात आहे.

लॅबसाठी असा आहे मार्ग
मुंबई-आग्रा महामार्गाकडून सय्यद पिंप्रीमार्गे आडगाव रस्त्याने लॅबकडे जाता येते. मात्र, हा रस्ता डांबरी असला, तरी छोटा आहे. त्यामुळे या रस्त्यावरून केवळ बैलगाडी जाईल, अशी स्थिती आहे. तसेच नाशिक-छत्रपती संभाजीनगर रस्त्याने येऊन लाखलगाव येथून सय्यद पिंप्रीमार्गे आडगावकडे जाणाऱ्या रस्त्यानेदेखील लॅबकडे जाता येते. मात्र, हा रस्तादेखील छोट्या रस्त्याला येऊन मिळत असल्याने, अवजड वाहनांना लॅबपर्यंत पोहोचणे अशक्य आहे.

रस्त्याची जबाबदारी जिल्हा परिषदेवर
लॅबपर्यंतचा सुमारे दोन ते अडीच किलोमीटरचा रस्ता कोणी उभारावा, हा तिढा निर्माण झाल्यानंतर आमदार अॅड. राहुल ढिकले आणि खासदार हेमंत गोडसे यांनी जिल्हा परिषदेकडे याबाबत पाठपुरवा केला होता. तसेच जि.प.च्या माध्यमातून हा रस्ता तयार करण्याचे आश्वासन दिले गेले होते. मात्र, अजूनही रस्ता उभारणीच्या कामाला मुहूर्त लागला नसल्याने, लॅबचे उद्घाटन रखडले आहे.

गेल्या 10 वर्षांपासून ही लॅब कार्यान्वित व्हावी, याविषयी उद्योजकांमध्ये उत्कंठा आहे. आता निवडणुका असल्यामुळे त्यात लॅबचे उद्घाटन अडकू नये, हीच इच्छा आहे. वास्तविक याठिकाणी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मात्र, जोपर्यंत अधिकृतपणे लॅबचे उद्घाटन होणार नाही, तोपर्यंत त्याचे उत्तमरीत्या ब्रॅण्डिंग करता येणार नाही. त्यामुळे रस्त्याचा प्रश्न त्वरित सोडवून लॅबचे उद्घाटन व्हावे. – मिलिंद राजपूत, माजी अध्यक्ष, निमा पॉवर

The post सीपीआरआय: रस्त्याअभावी इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे रखडले उद्घाटन appeared first on पुढारी.