निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्यास प्रारंभ, भाविकांची अलोट गर्दी

Nashik News www.pudhari.news

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवाजय बाबाजी भक्त परिवारातर्फे जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्यास रविवारी (दि. १७) भक्तिभावात प्रारंभ झाला. महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते रामकुंड येथे गोदेची पूजा अर्चा करण्यात आली. त्यानंतर येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ७७७ किलो चांदीच्या रथात राष्ट्रसंत जनार्दनस्वामी महाराज यांच्या चरणपादुका ठेवण्यात आल्या होत्या. कलशधारी महिला, टाळ-मृदंगाच्या गजरात व ओम जनार्दनाय नमःचा घोष करीत मिरवणूक मार्गावरील वातावरण चैतन्यदायी झाले होते. तपोवनातील साधुग्राम मैदानावर यानिमित्ताने कुंभमेळ्याच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.

राष्ट्रसंत जनार्दनस्वामी महाराजांच्या ३४ व्या पुण्यतिथीनिमित्त जय बाबाजी भक्त परिवारातर्फे या धर्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या सोहळ्यास प्रारंभ झाला. याप्रसंगी महंत सेवागिरी महाराज, महंत परमेश्वरानंदगिरी, स्वामी कैवल्यानंद महाराज, स्वामी देवानंद महाराज, ब्रह्मचारी ऋग्वेदानंद महाराज, श्रीपादानंद महाराज, रामानंद महाराज, दौलतानंदगिरी महाराज, हृदयानंद माउली, आत्मा मालीक ध्यानपीठाचे संत अभयानंद महाराज, पिनाकेश्वरानंद महाराज उपस्थित होते.

पहाटे ४ वाजता जनार्दनस्वामी यांचा स्पर्श झालेल्या वेरूळ येथील सिद्धेश्वर शिवलिंगास अभिषेक करण्यात आला. पहाटे ५ वाजता विधिग्रंथाचे सामूहिक पठण करून, सकाळी ६ वाजता भागवत कथेवर आधारित २० मिनिटांची नाटिका सादर झाल्यानंतर, सत्संग व आरती करण्यात आली.

सकाळी ८ वाजता रामकुंड येथे शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते गोदेची विधिवत पूजा करून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. जनार्दनस्वामी यांच्या चरणपादुका असलेला रथ मिरवणुकीत अग्रभागी होता. या मिरवणुकीत २०० टाळकरी, मृदंग वादक, १०८ कलशधारी मुली व महिला, लेझीम पथक, झांज पथक, ११ शंख, ११ डमरू, दोन त्रिशूल यांचा समावेश होता. यानंतर शांतिगिरी महाराज यांनी धर्म सोहळ्यातील विविध धार्मिक उपक्रमांचा प्रारंभ केला.

आठ दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

आठ दिवस या ठिकाणी रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा यांची श्रीराम कथा, महायज्ञ, पुरुष व महिला यांचे मौनव्रत अनुष्ठान, अखंड नंदादीप, हस्तलिखित नामजप, नामसंकीर्तन, अभिषेक, भागवत पारायण, नित्यनियम विधी, महाआरती, भागवत वाचन, ध्यान, प्राणायाम, सत्संग, श्रमदान आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

हेही वाचा :

The post निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्यास प्रारंभ, भाविकांची अलोट गर्दी appeared first on पुढारी.