नाशिक जिल्ह्यात ४१ जनावरांचा लम्पीने मृत्यू

लम्पी संसर्ग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून लम्पी या जनावरांच्या त्वचारोगाने जवळपास ४१ जनावरे दगावली आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाला आता जाग आली असून, त्याबाबत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बैठक बोलावत उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

जिल्ह्यात जनावरांमधील लम्पी चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगप्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार संपूर्ण नाशिक जिल्हा जनावरांमधील लम्पी चर्मरोग या आजारासाठी बाधित क्षेत्र म्‍हणून घोषित करण्यात येत आहे. या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाने गोवर्गीय पशुधनातील या साथीच्या रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचा सूचनांमध्ये समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. गिरीश पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात आठ लाख ९५ हजार ५० गोवंशीय पशुधन आहे. सध्या जिल्ह्यात ४९ ईपी सेंटरमधून ३१८ जनावरे बाधित झाली असून, त्यात ४१ जनावरांची प्रकृती गंभीर आहे. त्यात सर्वाधिक गंभीर जनावरे येवला (१४), सिन्नर व निफाड प्रत्येकी (३), नांदगाव व दिंडोरी प्रत्येकी (२) आहेत. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक १५३, येवल्यात १३१, निफाडमध्ये ९७, नाशिकला ४६ लम्पीग्रस्त जनावरे आहेत. जिल्ह्यात नऊ लाख ५० हजार लशीची मात्रा प्राप्त झाली होती. त्यापैकी सात लाख ७८ हजार ६५३ जनावरांना लसीकरण पूर्ण झाले. दोन दिवसांत उर्वरित लसीकरण पूर्ण होणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात येत आहे.

ज्याठिकाणी गोवर्गीय जनावरांमध्ये लम्पी आजाराचे लक्षणे आढळल्यास त्याबाबत तत्काळ लगतच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयास संपर्क साधावा. गोठ्यांचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमितपणे निर्जंतूक फवारणी करावी. त्याचप्रमाणे साथीच्या रोगामुळे मृत पावलेल्या जनावरांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी संबंधित विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी केल्या.

हेही वाचा :

The post नाशिक जिल्ह्यात ४१ जनावरांचा लम्पीने मृत्यू appeared first on पुढारी.