नाशिक जिल्ह्यावर अवकाळीचा फेरा कायम

अवकाळी पावसाचे थैमान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात अवकाळीचा फेरा कायम आहे. मंगळवारी (दि.११) ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळीने झोडपून काढले. नाशिक शहरात सायंकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली. ग्रामीण भागात सिन्नर, निफाड, पेठ व चांदवडमध्ये विजेच्या कडकडाटांसह जोरदार सरी बरसल्या. दिंडोरीच्या पश्चिम पट्ट्यासह त्र्यंबकेश्वरमधील काही गावांना गारपिटीने तडाखा दिला. त्यामुळे पिके धोक्यात आली असून, बळीराजा संकटात सापडला आहे.

पाच दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळीने मुक्काम ठोकला आहे. दिवसा तीव्र उकाडा आणि सायंकाळनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट अशा विचित्र हवामानाचा अनुभव जिल्ह्यावासीयांना येत आहे. मंगळवारी (दि.११) सायंकाळी त्याचा जोर कायम होता. नाशिक शहर व परिसरात सायंकाळी ५ च्या सुमारास वादळी वाऱ्यांसह तसेच विजेच्या कडकडाटांसह जोरदार पावसाला प्रारंभ झाला. यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते. तासभर चाललेल्या पावसामुळे घराकडे परतणाऱ्या नाशिककरांचे हाल झाले.

दिंडाेरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील टेंटमाळ, गांडोळे, घाटाळबरी, चिकाडी, सवरपातळी, देहरे व मोखानाळ या गावांमध्ये सायंकाळी ५.३० ला गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. या पावसाने कांदा, द्राक्ष, मका, भाजीपाला, टोमॅटो व अन्य पिके धोक्यात आली आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील शिरसगाव, नांदूरकिपाडा व गडदवणे येथे गारपीट झाली. तर पेठमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने घरांची पडझड झाली. सिन्नर, निफाड व चांदवडमध्येही सायंकाळनंतर तुरळक सरी बरसल्या. अन्य तालुक्यांत काही भागात हलक्या सरी बरसल्याचे समजते आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील चार दिवसांत जिल्ह्याला अवकाळीचा इशारा दिला आहे.

९८ हेक्टरचे नुकसान

जिल्ह्याला सोमवारी (दि.१०) गारपीट व अवकाळी पावसाने दणका दिला. या पावसामुळे ९८.५५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच ग्रामीण भागांमध्ये निरनिराळ्या ठिकाणी ८०२ घरांची पडझड झाली आहे. याशिवाय चार पोल्ट्रीफार्मचे पूर्णत: नुकसान होऊन त्यात १३ हजार ५०० पक्षी गतप्राण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा : 

The post नाशिक जिल्ह्यावर अवकाळीचा फेरा कायम appeared first on पुढारी.