Nashik : सुरगाणा तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा

सुरगाणा वादळी पाऊस,www.pudhari.news

सुरगाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्ह्यात सुरगाणा शहरासह तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह बेमोसमी पाऊस झाल्याने खेड, खोकरी, निंबारपाडा, युवराजवाडी आदी ठिकाणी घरांचे, एका जिल्हा परिषद शाळेचे तसेच आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यंदा आदिवासी बांधवांना आंबा पिकातून काहीही उत्पन्न मिळणार नाही अशी स्थिती आहे.

सकाळपासूनच वातावरणात उष्णता जाणवत होती. त्यामुळे पाऊस होईल याचा अंदाज व्यक्त केला जात होता. सायंकाळी ६ च्या दरम्यान सुरगाणा शहरासह तालुक्यातील खोकरी, निंबारपाडा, युवराजवाडी, खेड आदी ठिकाणी घरांसह जिल्हा परिषद शाळेचे नुकसान झाले. जोरदार वारा आणि पावसाचा तासभर तडाखा बसला. वादळ वाऱ्यामुळे घरांचे छप्पर उडाले. घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. खेड येथे जिल्हा परिषद शाळेचे नुकसान झाले आहे. निंबारपाडा येथील हनुमान मंदिराचे नुकसान झाले असून, जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडून गेले आहेत.

खोकरी येथील कुसुम धूम, काशीनाथ धुळे, यशवंत वाघमारे, सावंजी धुळे, परशराम महाले, दिनेश चोथवे, हिरामण चाळखे, हरी महाले, दिनकर चौधरी, मधुकर बोरसे, मोमतीबाई बोरसे आदींच्या घरांचे छप्पर उडून नुकसान झाले आहे. खेड येथे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. वादळ वाऱ्यामुळे परिसरातील आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा : 

The post Nashik : सुरगाणा तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा appeared first on पुढारी.