नाशिक : झाडांना खिळे ठोकणार्‍या आणखी 19 व्यावसायिकांवर गुन्हे दाखल

झाडांना खिळे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जाहिराती तसेच विद्युत रोषणाईसह अन्य कारणांसाठी झाडांवर खिळे ठोकून त्यांना इजा पोहोचविणार्‍यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा महापालिकेचा सपाटा सुरूच आहे. आणखी 19 विक्रेत्यांसह आस्थापनांवर गुन्हे दाखल केले असून, काहींना दंडही ठोठावला आहे.

दरम्यान, उद्यान निरीक्षकांकडून शहरातील झाडांची पाहणी केली जात असून, झाडांना इजा पोहोचविणार्‍यांवर यापुढेही गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे उद्यान विभागाने स्पष्ट केले आहे. सातपूर, गंगापूर भागात सर्वाधिक गुन्हे दाखल असून, या भागात झाडांवर खिळे ठोकून फलक-बॅनर लावणार्‍या फुकट्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, काही फुकटे या झाडांवर फलक-बॅनर लावणे, विद्युत रोषणाई करून स्वत:ची जाहिरात करतात. अनेकजण झाडांना इजा पोहोचवतात. झाडांना त्रास होईल, असे कृत्य केले जात आहे. त्यामुळे झाडांची हानी होत असून, याविरोधात उद्यान विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. काही कंपन्या, राजकीय पक्ष किंवा व्यक्ती, जाहिरातदार हे झाडांवर खिळे ठोकून तसेच फलक, भित्तिपत्रके व जाहिराती लावतात.

सुटीचा वार बघून वृक्षतोड
गेल्या काही दिवसांपासून शनिवार-रविवार हा सुटीचा वार बघून शहरात बेसुमार वृक्षतोड होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामध्ये महापालिकेच्या ठेकेदारांचा सहभाग असल्याचे समोर येत असून, त्यांच्याकडूनच विनापरवानगी वृक्षतोड करण्याचे प्रकार केले जात आहेत. दरम्यान, नागरिकांना अशा प्रकारची वृक्षतोड आढळल्यास, त्यांनी उद्यान विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : झाडांना खिळे ठोकणार्‍या आणखी 19 व्यावसायिकांवर गुन्हे दाखल appeared first on पुढारी.