नाशिक : टाकळीतील खड्ड्यांकडे ‘दिव्य’दृष्टी; प्रशांत दिवे यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

टाकळी खड्डे www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

खड्ड्यांमुळे वाहनधारकांची होणारी कसरत पाहता दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध करताच‌ महापालिका प्रशासनास जाग आली आहे. तर माजी प्रभाग सभापती प्रशांत दिवे यांनीही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने टाकळी गाव परिसरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. लवकरच टाकळी रस्त्याचे काम पूर्ण केले जाणार असून, वाहनधारकांना खड्ड्यांतून पार पाडावे लागणारे ‘दिव्य’ आता थांबणार आहे. कामाला सुरुवात झाल्याने वाहनधारक तसेच सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नाशिकरोडचे प्रभाग सभापती प्रशांत दिवे यांनी याप्रश्नी तातडीने दखल घेत प्रशासनाला धारेवर धरले. यानंतर जेसीबी, रोडरोलर तसेच कामगारांसह महापालिका अधिकारी तातडीने टाकळी गावात फौजफाट्यासह दाखल झाले. दिवे यांनी काम पूर्ण होत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांना येथून जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे कामाल गती निर्माण झाली. दरम्यान, मागील काही दिवसांपासून टाकळी गावातील माजी महापौर अशोक दिवे यांच्या निवासस्थानाजवळ मोठमोठे खड्डे पडले होते. त्यातच या भागातून अवजड वाहनांच्या वाहतुकीला परवानगी दिल्यामुळे रस्त्याची अवस्था अतिशय बिकट बनली होती. यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. काही वेळा तर येथे अपघातांच्या घटनाही घडल्या होत्या. वाहनधारकांना भेडसावणाऱ्या समस्येकडे महापालिका प्रशासनाने कानाडोळा केला होता. याविषयी दैनिक ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल प्रशांत दिवे यांनी घेत महापालिका अधिकाऱ्यांकडून काम पूर्ण करून घेतले आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविल्यामुळे वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : टाकळीतील खड्ड्यांकडे ‘दिव्य’दृष्टी; प्रशांत दिवे यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर appeared first on पुढारी.