नाशिक : टोमॅटो व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची दोन कोटींची फसवणूक

फसवणूक,www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

शेतकऱ्यांकडून टोमॅटोची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी एक कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. हे टोमॅटो व्यापारी शेतकऱ्यांचे पैसे न देता फरार झाल्याने सोमवारी (दि. २७) शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाकडे निवेदन देऊन तक्रार करीत पैसे मिळून देण्याची मागणी केली आहे. या व्यापाऱ्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डात जिल्हाभरातील विविध भागांतून टोमॅटो विक्रीसाठी येतो. टोमॅटो खरेदीदार व्यापाऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करून शेतकऱ्यांना टोमॅटोची रक्कम दिली जाते. टोमॅटो व्यापारी नौशाद फारुकी व समशाद फारुकी यांनी सप्टेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या चार महिन्यांच्या कालावधीत शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी केले. मात्र, त्याचे पैसे दिले नाहीत. ज्या शेतकऱ्यांना त्यांनी धनादेश दिले, ते धनादेश त्याच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने वठले नाहीत. या व्यापाऱ्यांकडे १७९ शेतकऱ्यांचे सुमारे एक कोटी ८० लाख रुपये अडकले आहेत. व्यापारी सध्या फरार आहेत. शेतकऱ्यांना या प्रकाराने धक्का बसला आहे. बाजार समितीच्या कार्यालयात या शेतकऱ्यांनी सचिव अरुण काळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत या व्यापाऱ्यांचे गाळे व मालमत्ता यांचे लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे मिळवून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मोठ्या कष्टाने पिकवलेला टोमॅटो व्यापाऱ्याने खरेदी केला. त्याचे पैसे अजूनही दिले नाहीत. आमच्या कष्टाचे पैसे घेऊन फरार झाल्याने बाजार समिती प्रशासनाने आमचे पैसे मिळवून देण्यासाठी सहकार्य करून न्याय मिळवून द्यावा.

-सुदाम काकड, शेतकरी, मखमलाबाद

 

शरदचंद्र मार्केट यार्डात आयटीसी ट्रेडिंग कंपनीत टोमॅटो दिला होता. त्याच्या पट्टीचे पैसे बाकी आहे. त्याकामी बाजार समिती प्रशासनाने पुढाकार घ्यावा व आमची रक्कम मिळवून द्यावी.

– परशराम जाधव, शेतकरी, वरवंडी

 

शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी संबंधित व्यापाऱ्याला बाजार समिती प्रशासनाने नोटीस दिलेली आहे. व्यापाऱ्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार नोंदविली आहे.

-अरुण काळे, सचिव, नाशिक बाजार समिती

“बाजार समिती प्रशासनाच्या हालचाली”

नाशिक बाजार समिती प्रशासनाने सदर व्यापाऱ्याने विकलेला गाळा ताब्यात घेतला आणि त्याची विक्री प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच सदर व्यापारी आपल्या खासगी मिळकती विकत असल्याबाबत बाजार समितीस माहिती मिळताच दस्त नोंदणी कार्यालयात पत्रव्यवहार करीत माहिती मागवली आहे. याबाबत माहिती उपलब्ध करून बाजार समिती कायद्यांतर्गत ५७ अ प्रमाणे कारवाई करणार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : टोमॅटो व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची दोन कोटींची फसवणूक appeared first on पुढारी.