सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
उत्तमनगर भागातील जनार्दनस्वामी नगर येथील मोकळ्या भूखंडावर उभ्या असलेल्या आयशर ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या घटनेत ट्रकमध्ये ठेवलेले लग्नाचे सामान जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जागेवर उभ्या असलेल्या ट्रकच्या (क्र. एमएच 04, डीके 2770) ट्रकच्या मागील चाकास रात्री एक ते दीडच्या सुमारास अचानक आग लागली. जवळच राहत असलेले स्थानिक रहिवासी विनोद आढांगळे यांना मोठा आवाज आला असता त्यांनी घराबाहेर येऊन बघितले तर आयशर ट्रकच्या मागील चाकास आग लागली होती. या आगीने हळूहळू रौद्ररूप धारण केल्याने दुसऱ्या टायरनेदेखील पेट घेतला. आढांगळे व नागरिकांनी ट्रक विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत ट्रकमधील लग्नाचे फर्निचर जळून खाक झाले.
ट्रकचालक मनोज गोराडे यांच्या भाचीचे लग्न होते. लग्नाचे किमती फर्निचर त्यांनी आपल्या ट्रकमध्ये ठेवलेले होते. यात सुमारे एक लाखाचे नुकसान झाल्याचे ट्रकमालक गोराडे यांनी सांगितले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या मोकळ्या भूखंडावर दररोज आठ ते दहा ट्रक उभ्या असतात. काही टवाळखोर या ट्रकच्या आडोशाला बसून मद्यपान करीत असतात. त्यामुळे या भागात पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा :
- केवायसी अपडेट करून घ्या, अन्यथा खात्यातील व्यवहारात येतील अडचणीत
- महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची प्रगती कौतुकास्पद : वासवान केरळ
- पुण्यात घराचे छत कोसळून प्रौढाचा मृत्यू
The post नाशिक : ट्रकने घेतला पेट अन् लग्नाचे फर्निचर झाले खाक appeared first on पुढारी.