भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा ३ जुलैला नाशिक दाैऱ्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा ३ जुलै रोजी नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने भाजपकडून नाशिक लोकसभा मतदारसंघाची चाचपणी केली जाणार असल्याची चर्चा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या नऊ वर्षपूर्तीनिमित्त भाजपकडून राज्यात महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून भाजपने आगामी लोकसभेची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जे. पी. नड्डा हे दि. ३ जुलैला नाशिकमध्ये येऊन पक्षाचा आढावा घेणार आहेत. ठक्कर डोम येथे नड्डांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची नाशिक कार्यकारिणीची बैठक पार पडणार असून, त्यानंतर ते जाहीरसभेला संबोधित करतील. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील महत्त्वाचे पदाधिकारी नाशिकमध्ये उपस्थित राहतील, असे कळते आहे.

भाजपने राज्यातील ४५ लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. या जागांवरून तेवढे खासदार केंद्रात पाठविण्यासाठी पक्षाकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ताब्यातील १३ लोकसभा मतदारसंघातही भाजपकडून चाचपणीवर भर दिला जातोय. यामध्ये सेनेच्या ताब्यातील नाशिक लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. गेल्या पंधरवड्यात भाजपचे राष्ट्रीय नेते कैलास विजयवर्गीय, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी नाशिकमध्ये येत जनतेशी संपर्क साधला. तसेच पक्षीय स्तरावर बैठक घेत निवडणुकीचा अंदाज घेतला. त्यानंतर भाजपने थेट नड्डा यांनाच नाशिकमध्ये आणण्याची तयारी केली आहे. भाजपच्या मास्टर स्ट्रोकमुळे सेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : 

The post भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा ३ जुलैला नाशिक दाैऱ्यावर appeared first on पुढारी.