नाशिक जिल्ह्यात मान्सूनची सलामी ; नागरिक सुखा‌वले

नाशिक पाऊस,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात मान्सूनने जाेरदार सलामी दिली. शहरामध्ये पहाटेपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. या सरींमुळे गेल्या चार महिन्यांपासून उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या नागरिकांच्या मनामध्ये उत्साह संचारला आहे. दरम्यान, जिल्ह्याला मंगळवारी (दि.२७) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

कोकण किनारपट्टीवर पंधरा दिवसांपासून रेंगाळलेल्या मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अरबी समु्द्रातील कमी दाबाचा पट्टा व बंगालच्या उपसागरातील मान्सूनसाठीचे हवामान अधिक बळकट झाल्याने मागील २४ तासांमध्ये पावसाने राज्यात सर्वदूर व्यापले आहे. नाशिक शहर व परिसरातही सोमवारी (दि.२६) पहाटेपासून पावसाच्या सरी कोसळल्या. तसेच दिवसभर अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे हवेतील उष्म्यात कमालीची घसरण झाली आहे. वातावरणातील या बदलामुळे नाशिककर सुखावले आहेत. बच्चेकंपनीने पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद लुटला. या सर्व धामधुमीत महापालिकेने पावसाळीपूर्वी केलेल्या रस्त्यांच्या कामांचा फज्जा उडाला. शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. परिणामी आठवड्याच्या पहिल्या दिवशी कार्यालय गाठण्याची लगबग करणाऱ्या नाशिककरांना मनस्ताप सहन करावा लागला. शहरात दिवसभरात २ मिमी पर्जन्याची नोंद झाली.

पेरण्यांना वेग

जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, येवला, निफाड, चांदवड तसेच पेठ व सुरगाण्याच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. या सरींमुळे लांबलेल्या पावसाने रखडलेल्या पेरण्यांना वेग आल्याने बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यात पुढील पाच दिवस चांगला पर्जन्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच मंगळवारी (दि. २७) संपूर्ण जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, या काळात घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस पडले, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

शहरात बत्ती गूल

मॉन्सूनच्या पहिल्याच पावसाने महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांचे पितळ उघडे केले आहे. पंचवटी परिसरातील वीजतारा तुटल्याने अनेक भागांचा विद्युतपुरवठा खंडित झाला. तसेच उदय कॉलनी, क्रांतीनगर भागातील ट्रान्स्फाॅर्मर जळाल्याने नागरिकांची कोंडी झाली. याशिवाय गंगापूर रोड, इंदिरानगरासह उपनगरांमध्ये ठिकठिकाणी वीजपुरवठ्याचा फज्जा उडला. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य नाशिककरांना सहन करावा लागला.

हेही वाचा : 

The post नाशिक जिल्ह्यात मान्सूनची सलामी ; नागरिक सुखा‌वले appeared first on पुढारी.