नाशिकमधून दोन लाख मराठा मुंबईत धडकणार

मराठा आंदोलन मुंबई,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मराठा आरक्षणाची पुढील लढाई मुंबईत लढली जाणार असल्याचे मनोज जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केल्यानंतर राज्यभरातील मराठा बांधव येत्या २४ जानेवारी रोजी मुंबईत धडकणार आहेत. नाशिकमधून तब्बल दोन लाख मराठा मुंबईतील आंदोलनात सहभागी होणार असून, प्रत्येक घरातून दोघे या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, नाशिककरांवर जेवणाची जबाबदारी सोपविली असून, त्यादृष्टीने ‘एक घर एक कट्टा, तेलाचा डब्बा’ असे नियोजन केले जात आहे.

मराठा आरक्षणासाठी डिसेंबर महिन्याचा अल्टीमेटम दिल्यानंतरही सरकारकडून कुठल्याच हालचाली केल्या गेल्या नसल्याने जरांगे-पाटील यांनी आरक्षणाचा पुढील लढा मुंबईत लढला जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी राज्यभरातील मराठा बांधवांनी मुंबईतील आंदोलनात सहभागी होणार असल्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यानुसार राज्यभरातील मराठा बांधव मुंबईतील लढ्याची तयारी करीत आहेत. नाशिक जिल्ह्यात देखील गेल्या दिवसांपासून बैठकांचा जोर सुरू असून, मराठा बांधवांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान, नाशिकमधील मराठा बांधवांवर जेवणाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यादृष्टीने सध्या नियोजन केले जात आहे. ‘एक घर एक कट्टा’ याप्रमाणे गव्हाचे संकलन केले जात आहे. त्याचबरोबर तेलाचे डबे, दाळ व इतर जीवनावश्यक वस्तू देखील गोळा करण्याचे नियोजन केले जात आहे.

मंगळवारी (दि.१६) जिल्ह्यातील काही मराठा आंदोलकांनी मनोज जरांगे-पाटील यांची आंतरवली सराटी येथे भेट घेवून जिल्ह्यातील आंदोलनाच्या नियोजनाबाबतची माहिती दिली. याप्रसंगी झालेल्या चर्चेत आंदोलनासाठी जिल्ह्यातून केलेल्या नियोजनाचा जरांगे-पाटील यांनी आढावा घेतला. यावेळी शिवसेना (ठाकरे गट) उपनेते सुनील बागुल, मराठा राज्य समन्वयक करण गायकर, शिवाजी सहाणे, विलास पांगारकर आदी उपस्थित होते.

मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर मुंबईतील आंदोलनाच्या नियोजनासाठी मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील नियोजनाबाबतची संपूर्ण माहिती त्यांना दिली. नाशिक जिल्ह्यातून किती मराठा बांधव आंदोलनात सहभागी होणार आहेत, याबाबतची देखील त्यांना कल्पना दिली. – करण गायकर, राज्य समन्वयक

हेही वाचा :

The post नाशिकमधून दोन लाख मराठा मुंबईत धडकणार appeared first on पुढारी.