नाशिक : ड्रोन जमा करण्यास ३० पर्यंत मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

लष्कराच्या अतिसंवेदनशील भागात ड्रोनने घिरट्या घातल्याने तेथील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याच्या घटनेनंतर पोलिस आयुक्तालयाने शहरातील सर्व ‘ड्रोन’ ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ड्रोनचालक-मालकांना त्यांच्याकडील ड्रोन पोलिस ठाण्यात जमा करण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार आत्तापर्यंत शहरात १७ ड्राेन जमा झाले आहेत. या आदेशाला ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या ताब्यात ड्रोन द्यावे लागणार आहेत.

देशविदेशात ड्रोनचा वापर करून दहशतवादी हल्ले झाले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून शहरातील १६ संवेदनशील ठिकाणी नो ड्रोन फ्लाय झोन जाहीर केले आहेत. तरीदेखील गेल्या दोन महिन्यात कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूल (कॅट्स) तसेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) क्षेत्रात ड्रोनने घिरट्या घातल्याचे उघडकीस आले. त्यामुळे येथील सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला. याआधीही महाराष्ट्र पोलिस अकादमी किंवा इतर ठिकाणी ड्रोन उडाल्यानंतर त्यांचा तपास लागलेला नसल्याने ड्रोन चालकांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी आयुक्तालय हद्दीत वापरण्यात येणारे सर्व ड्रोन पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश ऑक्टोबरच्या सुरुवातीस काढले. पोलिसांकडे जमा केलेले ड्रोन अर्ज केल्यानंतर वापरायच्या दिवशी चालकांना देण्यात येतील. तर, ड्रोन वापरासाठी पोलिसांचा सशुल्क बंदोबस्तही घ्यावा लागणार आहे.

त्यामुळे ड्रोनचालकांमध्ये नाराजी पसरली होती. सुरुवातीस कोणीही ड्रोन जमा केले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी नोटिसा बजावण्यास सुरुवात केली. त्यानंतर १७ जणांनी ड्रोन पोलिसांकडे जमा केले आहेत. या मनाई आदेशाची मुदत संपल्याने पोलिस आयुक्तांनी त्यात पुन्हा ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे ड्रोनचालक-मालकांना ड्रोन जमा केल्याशिवाय पर्याय नसल्याचे बोलले जात आहे. हे मनाई आदेश यापुढे कायम लागू राहणार असल्याचेही आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिक : ड्रोन जमा करण्यास ३० पर्यंत मुदतवाढ appeared first on पुढारी.