नाशिक : ताडपत्री कापून उभ्या ट्रकमधून दीड लाखांचा माल लांबवला

नाशिक, सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

अहमदनगर येथून ट्रान्सपोर्टवरुन माल घेऊन निघालेल्या ट्रकमधील सुमारे दीड लाखांच्या साहित्याचे बॉक्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नाशिक पुणे महामार्गावर गुरेवाडी शिवारात रविवारी (दि.30) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, माणिक बाबुराव सराटे हे रविवारी (दि.30) पुणे येथून माल (क्र.एमएच-12, एफसी-6756) भरुन निघाले होते. अहमदनगर येथील एका ट्रान्सपोर्टवरुन काही माल आपल्या ट्रकमध्ये भरुन घेतला व नाशिकच्या दिशेने निघाले.

रात्री 10 वाजेच्या सुमारास ते गुरेवाडी शिवारातील स्वामी समर्थ पेट्रोल पंपावर जेवण करण्यासाठी थांबले. जेवण केल्यानंतर तेथेच ट्रक उभा करुन ते केबिनमध्ये झोपले. सोमवारी (दि.31) सकाळी 8 वाजता उठून पाहिले असता गाडीच्या पाठीमागील ताडपत्री कापून अज्ञात चोरट्यांनी ट्रकमधील मेडीसीन, कपड्याच्या गाठी व सिगारेट असलेले दीड लाख रुपये किंमतीचे बॉक्स लांबविल्याचे निदर्शनास आले. सराटे यांनी तात्काळ मुसळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.

पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब त्रिभुवन करत आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : ताडपत्री कापून उभ्या ट्रकमधून दीड लाखांचा माल लांबवला appeared first on पुढारी.