नाशिक : दारणा, नांदूरमधमेश्वरच्या विसर्गात वाढ

दारणा धरण नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने दारणा धरण ७८ टक्के भरले आहे. मंगळवारी (दि. २५) दुपारी १२ ला धरणातील विसर्गात ३ हजार ५८४ क्यूसेकपर्यंत वाढ करण्यात आली, तर नांदूरमधमेश्वरचा विसर्ग ७ हजार १९० क्यूसेकपर्यंत वाढविण्यात आला आहे. दरम्यान, भावली धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, ते कोणत्याही क्षणी ओव्हरफ्लो होऊ शकते.

गेल्या चार दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांमधील पाण्याची आवक वाढली आहे. तालुक्यातील सर्वांत महत्त्वाचे धरण असलेले दारणा ७८ टक्के भरले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव धरणातून ३,५८४ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग दारणा नदीपात्रात केला जात आहे. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच विसर्ग सोडण्यात आल्याने नदीकाठावरील गावांना दिलासा मिळाला आहे. मात्र, येत्या काळात पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात वाढ केली जाऊ शकते. त्यामुळेच नदीकाठावरील गावांना सतर्क राहणे आवश्यक आहे.

तालुक्यातील दुसरे सर्वांत मोठे असलेले धरण ५६ टक्के भरले असून, प्रकल्पातील साठा ४,०३२ दलघफूवर पोहोचला आहे. तर यंदाच्या हंगामात जिल्ह्यात पहिल्यांदाच भावली धरण काठोकाठ भरले आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने ही काहीशी समाधानकारक बाब आहे. दरम्यान, वरील धरणातून पाण्याची आवक वाढल्याने नांदूरमधमेश्वरच्या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली. प्रकल्पातून सकाळी ११ ला ३,१५५, दुपारी 2 ला ५,५७६, तर 4.30 ला ७,१९० क्यूसेकपर्यंत नेण्यात आला. त्यामुळे वेगाने पाणी जायकवाडीकडे झेपावत आहे.

गंगापूर @ 55

नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ५५ टक्के भरले आहे. प्रकल्पात ३,१०९ दलघफू साठा आहे. दरम्यान, जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत आजमितीस २६ हजार ९९२ दलघफू साठा असून, त्याचे प्रमाण ४१ टक्के इतके आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : दारणा, नांदूरमधमेश्वरच्या विसर्गात वाढ appeared first on पुढारी.