नाशिक : दिवाळसणापासून दिंडोरीत वारंवार बत्ती गुल

light www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
शहरात विजेचा लपंडाव ही नित्याचीच बाब झाली आहे. वारंवार होणार्‍या विजेच्या लपंडावामुळे सर्वसामान्य व्यावसायिक, नागरिक त्रासले असले तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दिंडोरीसारख्या शहरात ऐन दिवाळीतसुद्धा नागरिकांना अंधारात राहावे लागले होते. वीजपुरवठा खंडित झाला की, तेवढ्यापुरती सोशल मीडियावर चर्चा होते आणि पुन्हा सर्वांनाच विसर पडतो. परंतु, येथील विजेच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कोणी पुढाकार घेणार आहे की नाही? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

वीजबिल वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा देणार्‍या महावितरण मंडळाची सुरळीतपणे वीजपुरवठा करण्याची जबाबदारी नाही का, असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कधी तांत्रिक बिघाड, तर कधी देखभालीच्या नावाखाली दिवसभरात अनेक वेळा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. लघुउद्योजक, विजेवर चालणारे फेब्रिकेशन, पीठगिरणी अशा प्रकारचे विविध व्यवसाय करून उपजीविका भागवतात. या प्रकारामुळे लघुउद्योजकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. आज प्रत्येक व्यवहार ऑनलाइन पद्धतीने चालतात. शाळा-महाविद्यालये, बँका, किराणा दुकाने, मेडिकल्स, महा-ई-सेवा केंद्रे, शासकीय कार्यालये अशा सर्वच ठिकाणी होणारे व्यवहार ऑनलाइन पद्धतीने होतात. यासाठी संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, बॅटरी यांसारखी किमती उपकरणे वापरली जातात. दिंडोरी शहरातील विद्युत प्रवाहातील कमी उच्चदाब तसेच सतत वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे ही उपकरणे नादुरुस्त होऊन व्यापार्‍यांचे नुकसान होत आहे. तसेच सेवेत खंड पडल्यामुळे ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

…म्हणे वरूनच बिघाड
तालुक्याचे ठिकाण म्हणून दिंडोरीला मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे सतत रेलचेल असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सतत विविध कारणांनी विजेचा लपंडाव सुरू आहे. विशेष म्हणजे, वारा अथवा पाऊस नसतानाही वीज गुल होत आहे. नागरिकांनी महावितरणकडे चौकशी केल्यानंतर वरूनच बिघाड आहे, असे सांगून निरुत्तर केले जाते.

महावितरणकडून कार्यवाहीची प्रतीक्षा
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर संबंधित महावितरण प्रशासनाची कारणेही नित्याचीच झाली आहेत. संपर्क साधला तरी वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे, पूर्ववत होण्याचा कालावधी आदी माहिती वीजग्राहकांना मिळत नाही. एरवी वीजदेयक वेळेत न भरल्यास तत्काळ दाखल होणारे महावितरणचे अधिकारी, ग्राहकांच्या या समस्येवर कोणती हालचाल करतात, याचीही नागरिकांना प्रतीक्षा आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : दिवाळसणापासून दिंडोरीत वारंवार बत्ती गुल appeared first on पुढारी.