नाशिक : दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्याला दिलासा द्यावा ; तहसीलदारांना निवेदन

देवळा ; अधिकाऱ्यांनी देवळा तालुक्यातील सर्व गावांची पाहणी करून तालुक्यातील दुष्काळाची भयानक दाहकता शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी व दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकरी व जनतेला दिलासा द्यावा यासह इतर मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. २०) रोजी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना निवेदन सादर केले.

निवेदनाचा आशय असा की, देवळा तालुक्यातील बहुतांशी गावांची पिक आणेवारी ५० पैशांच्या आत आहे. तसेच देवळा तालुका हा नेमकी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. तसेच त्यामुळे तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. देवळा तालुक्यातील दुष्काळाची भयानकता बघता, यावर्षी दोन ते तीन वेळा पेरणी करूनही उभी पिके जळालेली आहे. त्यामुळे पेरणीचा खर्च वाया गेलेला आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील ४३ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर टू लागू करण्यात आलेला आहे. यात देवळा तालुक्याचा समावेश नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्याप्रमाणात असंतोष व संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

या परिस्थितीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास जाणे अपेक्षित आहे. मात्र या गंभीर समस्यांकडे तालुक्याचे आमदार व केंद्रीय राज्यमंत्री हेतूपुरस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी माजी आमदार कोतवाल यांनी केला.

यात प्रामुख्याने देवळा तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करावा, कांदा अनुदान वितरणाची प्रक्रिया जलदगतीने राबवून शेतकऱ्यांच्या खात्यावर संपूर्ण कांदा अनुदान वर्ग करावे, सरसकट पीक विमा भरपाई मिळावी, सरसकट कर्ज माफी देण्यात यावी , दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे १०० टक्के विज बिल माफ करून शैक्षणिक विद्यार्थ्यांची फी माफ करावी, देवळा तालुक्यासाठी पिण्याचे पाणी राखीव ठेवावे, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा.. दुष्काळाच्या दृष्टीने उपाय योजना करण्यात याव्यात, सोयाबीनला १० हजार रुपये हमी भाव देण्यात यावा व मका ला हमीभाव देण्यात यावा. चणकापूर उजव्या कालव्याची वहन क्षमता वाढविण्यात यावी , म्हशाड नाल्याचे पाणी चणकापूर उजव्या काव्यात सोडण्या कामी कार्यवाही करण्यात यावी व रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.

यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिनकर निकम, दिलीप आहेर, दिलीप पाटील, स्वप्निल सावंत, अरुणा खैरणार, संजय सावळे, बाळू शिंदे, महेंद्र आहेर, रवींद्र जाधव, रवींद्र अहिरे, बाळासाहेब देवरे, प्रसाद देशमुख, योगेश पवार, कैलास पवार, तुषार शिंदे, चिंतामण पवार, रोहित पवार, रितेश निकम, व्ही आय शिरसाठ, विनोद आहेर आदी उपस्थित होते .

The post नाशिक : दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्याला दिलासा द्यावा ; तहसीलदारांना निवेदन appeared first on पुढारी.