नाशिक देशातील टॉप शहरांच्या स्पर्धेत : जिल्हाधिकारी जलज शर्मा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– वेगाने विकसित होणारे शहर म्हणून ओळखले जात असलेले नाशिक देशातील टॉप शहरांच्या स्पर्धेत आहे. राज्यातील मुंबई, पुणे या शहरांमध्ये ज्या प्रकारचे इंटेरियरचे मटेरियल आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे, ते सर्व नाशिकमध्ये उपलब्ध असून, एक्स्पोमध्ये त्याची प्रचिती दिसून येत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.

गुरू पब्लिसिटी आणि दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ठक्कर डोम येथे आयोजित ‘स्मार्ट हाउस इंटेरियर एक्स्पो’च्या उद‌्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आर्किटेक्ट प्रफुल्ल कारखानीस, अभिनेता चिन्मय उदगीरकर, क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष कृणाल पाटील, दीपक बिल्डर्सचे दीपक चंदे, आयआयए नाशिक सेंटरचे अध्यक्ष आर्कि. रोहन जाधव, बी. बी. चांडक, मुख्य आयोजक तथा गुरू पब्लिसिटीचे संचालक रवि पवार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शर्मा यांनी एक्स्पोमधील स्टॉल्सला भेट देत इंटेरियर मटेरियल्स आणि टेक्नॉलॉजीची माहिती जाणून घेतली. तसेच एक्स्पोचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

अभिनेता चिन्मय उदगीरकर यांनी, ‘नाशिकची ओळख आध्यात्मिक शहर आहे. आता ते विकसित होणारे शहर म्हणून पुढे येत आहे. येथील निसर्गदेखील प्रसिद्ध आहे. निसर्ग, अध्यात्म आणि प्रगती यांचा सुरेख संगम साधण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे एक्स्पो आहे. नाशिकमधील घरे, येथील घरांची शैली ज्या पद्धतीने समोर येत आहे, ती सुंदरतेची लाट आहे. आधुनिक घरे कशी असावी याचे उदाहरण या एक्स्पोच्या माध्यमातून देता येईल, याकडे लक्ष वेधले. रवि पवार म्हणाले, ‘गेल्या वर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर आम्ही हा एक्स्पो आयोजित केला असून, यालादेखील मोठा प्रतिसाद लाभेल, अशी अपेक्षा आहे. इंटेरियरसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्याने, इंटेरियरबाबतच्या नवीन संकल्पना बघण्याची मोठी संधी नागरिकांना आहे. नागरिकांनी या एक्स्पोला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

एक्स्पोमध्ये उत्तर महाराष्ट्रातील शंभर स्टॉल्स उभारण्यात आले असून, गृहसजावटीच्या असंख्य पर्यायांच्या उपलब्धता एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये इंटेरियर, एक्स्टेरियर, स्मार्ट होम, डेकॉर आर्ट, बिल्डिंग मटेरियल्स या श्रेणींचा समावेश आहे. प्रदर्शनात उत्तर महाराष्ट्रातील नामांकित समूहांचा सहभाग असल्याने, त्यांचे मटेरियल आणि टेक्नॉलॉजी बघण्याची उत्तम संधी नाशिककरांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पहिल्याच दिवशी गर्दी

एक्स्पोच्या पहिल्याच दिवशी अनेक नागरिकांनी गर्दी करीत इंटेरियरचे मटेरियल आणि तंत्रज्ञान जाणून घेतले. एक्स्पोमध्ये प्रशस्त स्टॉल्स उभारले असून, लाइव्ह डेमो बघण्याची संधी नागरिकांना मिळत आहे. गृहसजावटीचे असंख्य पर्याय असल्याने, नागरिकांनी स्टाॅल्सधारकांकडून त्यांचे संपर्क क्रमांक मिळविले. शनिवार, रविवारी गर्दीचा मोठा उच्चांक बघावयास मिळेल, अशी आयोजकांना अपेक्षा आहे.

हेही वाचा l

The post नाशिक देशातील टॉप शहरांच्या स्पर्धेत : जिल्हाधिकारी जलज शर्मा appeared first on पुढारी.