तीन लाख रुपये प्रतिकिलोने व्हायची ‘एमडी’ विक्री

ललित पाटील, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एमडी प्रकरणात अटकेत असलेल्या ललित पानपाटील याच्याकडील चौकशीतून त्यांनी तयार केलेली एमडी ३ लाख रुपये प्रति किलो दराने विक्री करत असल्याचे उघड झाले आहे. त्याचप्रमाणे नाशिकमधील शिंदे गावात उभारलेल्या कारखान्यात महिन्यातून अवघे पाच ते सात दिवस एमडी तयार केला जात होता. त्यानंतर कारखाना पूर्ण स्वच्छ करुन उर्वरीत दिवस कारखाना बंद ठेवला जात असल्याची माहिती ललितने अंमली पदार्थ विरोधी पथकास दिली आहे. (Nashik Drug Case)

शिंदे गावातील एमडी प्रकरणात संशयित ललित पानपाटीलसह रोहित चौधरी, हरिशपंत, जिशान शेख हे अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या ताब्यात आहेत. पोलिस चौकशीत ललितच्या सांगण्यावरुन भूषण पानपाटील, अभिषेक बलकवडे व जिशान हे शिंदे गावातील कारखान्यात एमडी तयार करत असल्याचे उघड झाले. एमडीची मागणी आल्यानंतर महिन्यातून एकदाच सर्व तयार करण्यात येत होता. त्यासाठी चौघे संशयित कारखान्यातच दिवस रात्र थांबून एमडी तयार करत होते. आठवडाभरात एमडी तयार करून कारखाना स्वच्छ केला जात असे. त्यानंतर महिनाभर कारखाना बंद ठेवला जात असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. (Nashik Drug Case)

एमडी तयार झाल्यानंतर ते दोन संशयितांमार्फत मुंबईसह इतरत्र वितरीत केले जात होते. त्यासाठी ३ लाख रुपये प्रति किलो दराने एमडीची विक्री ललितने केली. एमडी विक्रीतून पैसे मिळाल्यावर रसायन व कच्चा माल खरेदी करून पुन्हा एमडी तयार केले जात असल्याचे ललितने पोलिसांना सांगितले. तसेच ललितने तयार केलेला १० ते १५ किलो एमडी मुंबईतील खरेदीदारांनी नाकारल्याचीही माहिती ललितने पोलिसांना दिली आहे. दरम्यान, ललितच्या माहितीनुसार मुंबईतील दोन साथीदारांना एनडीपीएस पोलिस लवकरच ताब्यात घेणार आहेत. (Nashik Drug Case)

भूषण-अभिषेक कारागृहात

एमडी प्रकरणात अटकेत असलेल्या संशयित भूषण पानपाटील व अभिषेक बलकवडे यांना न्यायालयाने बुधवारी (दि.१३) न्यायालयीन कोठडी सुनावली. तर सामनगाव एमडी तस्करीत अटक केलेला उमेश वाघ याला २२ डिसेंबरपर्यंत मोक्कांतर्गत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post तीन लाख रुपये प्रतिकिलोने व्हायची 'एमडी' विक्री appeared first on पुढारी.