नाशिकच्या भद्रकालीतील व्यवसायांबाबत नितेश राणेंची लक्षवेधी

नितेश राणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरातील भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री उशिरापर्यंत शटर अर्ध्यापर्यंत खाली करुन व्यवसाय सुरू असतात. त्याठिकाणी अनेक प्रकारचे अवैध धंदे सुरू असून, अंमली पदार्थही विक्री होत आहे. मात्र त्यावर ठोस कारवाई होत नसल्याची लक्षवेधी आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केली.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात बुधवारी (दि.१३) दुपारी आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी भद्रकाली परिसरातील रात्री उशीरापर्यंत सुरु असलेल्या व्यवसायांचा मुद्दा उपस्थित केला. आ. राणे यांनी नाशिक शहरातील भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचा दावा केला आहे. दुकानांचे अर्धे शटर उघडे ठेवून हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. अवैध धंदेही सुरू असून तेथील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांशी संपर्क साधूनही त्यांनी कारवाई न केल्याचा दावा विधानसभेत केला. त्यामुळे अवैध धंद्यावर कारवाई करावी, अशी मागणी आ. राणे यांनी केली. दरम्यान, भद्रकालीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी सांगितले की, हद्दीतील सर्व हॉटेल रात्री अकरा वाजता बंद करुन त्यासंदर्भात नियमित नोंद घेण्यात येते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही कळविण्यात येते. रात्री उशिरा सुरू असलेल्या हॉटेलांवर कारवाई देखील केली जाते. गतवर्षीही हिवाळी अधिवेशनात आ. राणे (MLA Nitesh Rane) यांनी अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर लक्ष वेधले होते. त्यानुसार तत्कालीन पोलिस निरीक्षकांची अपर पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी झाली. तर एका पोलिस अंमलदारास पोलिस मुख्यालयात नेमण्यात आले होते.

हेही वाचा :

The post नाशिकच्या भद्रकालीतील व्यवसायांबाबत नितेश राणेंची लक्षवेधी appeared first on पुढारी.