नाशिक दौरा : निमित्त वर्धापन दिनाचे; तयारी लोकसभेची

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनादेखील नाशिकमधून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. यंदा प्रथमच मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होत असून, त्यासाठी पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) गुरुवार (दि. ७)पासून पुढील तीन दिवस नाशिकच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात श्री काळाराम मंदिराच्या दर्शनासाठी पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी तसेच वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून ते आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता आहे.

मनसेचा बालेकिल्ला राहिलेल्या नाशिकवर सर्वच पक्षांचा डोळा असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक दौरा करीत काळारामाचे दर्शन केले होते. त्यानंतर शिवसेना-ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील सहकुटुंब काळारामाची आरती केली होती. आता मनसेप्रमुख राज ठाकरेदेखील आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी काळारामाच्या चरणी नतमस्तक होणार आहेत. गुरुवारी (दि. ७) सायंकाळी राज यांचे शहरात आगमन होणार आहे. पाथर्डी फाट्यावर त्यांचे कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत केले जाणार आहे. शुक्रवारी (दि. ८) सकाळी ९ वाजता ते पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात सहकुटुंब महाआरती करणार आहेत. त्यानंतर दिवसभर पक्षीय कार्यक्रमात ते सहभागी होतील. यामध्ये ते जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत बैठका घेऊन आगामी निवडणुकीसंदर्भातील आढावा घेणार आहेत.

शनिवारी (दि. ९) दादासाहेब गायकवाड सभागृहात मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे अधिवेशन तसेच मेळावा होणार आहे. मेळाव्यात ते उपस्थित पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. दरम्यान, स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून संपूर्ण शहरभर होर्डिंगबाजी करीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे. जागोजागी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या स्वागताचे फलक उभारण्यात आले आहेत. कधीकाळी मोठे वैभव असलेल्या मनसेची सद्यस्थिती खूपच केविलवाणी आहे. अशात या वर्धापन दिन सोहळ्यातून पक्षात पुन्हा चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

भावी मुख्यमंत्री
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसे कोणासोबत युती, आघाडी करणार की स्वबळावर लढणार हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. असे असले तरी काही कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले होर्डिंग्ज शहरभर लावले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातून मनसेचा संभाव्य उमेदवार अद्याप गुलदस्त्यात आहे. पक्षातूनच उमेदवार निवडणार की, आयात उमेदवारावर निवडणुकीला सामोरे जाणार या प्रश्नांची उत्तरे मेळाव्यातून मिळण्याची शक्यता आहे.

The post नाशिक दौरा : निमित्त वर्धापन दिनाचे; तयारी लोकसभेची appeared first on पुढारी.