नाशिक : द्राक्ष शेतकऱ्यांना गंडविणारा फरार व्यापारी जेरबंद

अटक,www.pudhari.news

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा

हस्तेदुमाला शिवारात सहा शेतकऱ्यांचा द्राक्षमाल खरेदी करून त्यांना कोणताही धनादेश अगर पैसे न देता, सुमारे ४९ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या परप्रांतीय व्यापाऱ्यास वणी पोलिसांनी कल्याण तालुक्यामधून हुडकून काढत अटक केली. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना चक्क दोन गावठी कट्टे सापडले. दिंडोरी न्यायालयाने त्याला बुधवार (दि. २८) पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

हस्तेदुमाला येथील शेतकरी गणेश महाले यांनी फेब्रुवारीत मोहम्मद अन्वर शहा (४५) या व्यापाऱ्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली होती. मोहम्मद शहा हा बिहारमधील सीतामढी येथील रहिवासी असून, गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो बिहार, गुजरात तसेच मुंबईत आपली ओळख लपवून राहात होता. वणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश बोडखे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी शाहाचा शोध सुरू केला होता. तो सध्या कल्याण तालुक्यातील बनेली गावात राहात असल्याचे कळल्यानंतर पोलिस पथकाने कल्याणच्या पोलिसांच्या मदतीने त्याला जेरबंद केले. त्याच्या अंगझडतीत दोन गावठी कट्टे सापडले. त्याच्याविरुद्ध कल्याण तालुका ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्यात तो कल्याण जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असल्याने न्यायालयाकडून त्याचा ताबा घेऊन त्याला वणीतील द्राक्ष शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी अटक करून वणीत आणण्यात आले. त्याला दिंडोरी न्यायालयाने दि. २८ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वणी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण उदे अधिक तपास करत आहेत. पोलिस पथकाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी तपास पथकाला 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

हेही वाचा : 

The post नाशिक : द्राक्ष शेतकऱ्यांना गंडविणारा फरार व्यापारी जेरबंद appeared first on पुढारी.