नाशिक : नववर्षात १९३ गावांना मिळणार ‘पोलीस पाटील’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– बहुप्रतिक्षित पोलिसपाटील व कोतवाल भरतीचा निकाल जिल्हा प्रशासनाने घाेषित केला आहे. बिगरपेसा क्षेत्रातील १९३ गावांमध्ये नवीन वर्षापासून पोलिसपाटील रुजू होतील. तसेच ७४ कोतवालांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. (Nashik Police Patil)

राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील पोलिसपाटील तसेच कोतवालांच्या रिक्तपदांसाठी भरती राबविण्यात येत आहे. त्यामध्ये पोलिसपाटलांच्या ६६६ जागांचा समावेश होता. मात्र, पेसा क्षेत्रातील भरतीला विरोध असून, त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पेसा क्षेत्रवगळता उर्वरित १९३ गावांमधील पोलिसपाटीलपदाच्या भरतीची प्रक्रिया राबविली. चालू महिन्याच्या प्रारंभी लेखी परीक्षा पार पडली. त्यानंतर प्रांताधिकारी यांच्या स्तरावर उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया बुधवारी (दि.२७) पूर्ण झाली. त्यामुळे या गावांमधील पोलिसपाटलांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नवनियुक्त पोलिसपाटलांच्या हाती नियुक्तिपत्र पडणार आहे. दरम्यान, पेसा क्षेत्रांतर्गत ४७३ पदांकरिता शासन स्तरावरून सूचना प्राप्त झाल्यानंतर भरतीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कोतवालांची नियुक्ती

जिल्ह्यातील एकूण १४६ कोतवालांची पदे रिक्त आहेत. शासनाच्या निर्दशानुसार पेसा क्षेत्रवगळून उर्वरित ७४ ठिकाणी कोतवालांची भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. कोतवालांकरिता लेखी परीक्षा घेत त्याचदिवशी निकाल घोषित करण्यात आले. परीक्षेत टॉपर असलेल्या उमेदवारांना आता नियुक्तिपत्र देण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यात हे कोतवाल त्यांच्या-त्यांच्या तलाठी सजेवर रुजू होतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : नववर्षात १९३ गावांना मिळणार 'पोलीस पाटील' appeared first on पुढारी.