नाशिक : नांदुरमध्यमेश्वरच्या दहा दरवाज्यांसाठी दीडशे कोटींचा निधी, अजित पवारांनी दिलं आश्वासन

नांदुरमध्यमेश्वर धरण,www.pudhari.news

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

निफाड तालुक्यातील गोदावरी नदीला पावसाळ्यात येत असलेल्या महापुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नांदुरमध्यमेश्वर धरणास उर्वरीत अतिरिक्त १० वक्राकार दरवाजे बसविण्यासाठी दीडशे कोटींचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार राज्य शासनाकडुन उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली.

निफाड मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी निधी मिळण्याबाबत आमदार दिलीप बनकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यात प्रामुख्याने नांदुरमध्यमेश्वर धरणास १० वक्राकार दरवाजे बसविणण्याचे काम मुख्य होते. निफाड तालुक्याच्या पश्चिम पट्टयातील करंजवण, पालखेड, वाघाड, गंगापुर, दारणा, ओझरखेड आदी विविध लहान – मोठ्या धरणांमधुन पावसाळ्यात सोडण्यात येणाऱ्या पुर पाण्यामुळे गोदावरी व कादवा नदीला महापुर येतो. नांदुर मध्यमेश्वर धरणातून क्षमतेपेक्षा जास्त येणारे पुर पाणी वाहुन जाऊ शकत नसल्याने तालुक्यात पुराची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे गोदावरी काठावरील अनेक गांवातील नागरीकांचे, घरांचे, जनावरांचे, शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. हे टाळण्यासाठी नांदुरमध्यमेश्वर धरणास उर्वरीत अतिरिक्त १० वक्राकार दरवाजे बसविण्याच्या प्रस्तावास तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी तत्वत: मान्यता दिलेली आहे.

हा प्रस्ताव अंतिम सुधारीत मान्यतेसाठी प्रलंबित आहे. तो मंजुर करुन या कामासाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली असता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधी केलेल्या कामाची तसेच २००६ व २०१९ मध्ये आलेल्या महापुराची आठवणींना उजाळा देत या कामासाठी आवश्यक असलेला निधी स्वत: पुढाकार घेऊन उपलब्ध करुन देईल, असे आश्वासन दिले. त्यानुसार संबंधित अधिकारी वर्गास तत्काळ सुचना देत कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याची माहीती बनकर यांनी दिली.

हेही वाचा : 

The post नाशिक : नांदुरमध्यमेश्वरच्या दहा दरवाज्यांसाठी दीडशे कोटींचा निधी, अजित पवारांनी दिलं आश्वासन appeared first on पुढारी.