नाशिक : ब्रह्मगिरीवरील रोपवेविरोधात ‘वृक्षांचा रोपवे’ उपक्रम

ब्रम्हगिरी रोपवेला विरोध,www.pudhari.news

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

ब्रह्मगिरीच्या पायथ्याला प्रस्तावित रोपवे च्या मार्गावर साधू, महंत, ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींनी वृक्षारोपण करत वृक्षांचा रोपवे हा अभिनव उपक्रम सुरू करत शासनाचा निषेध नोंदविला.

प्रस्तावित अंजनेरी-ब्रह्मगिरी रोपवेला पर्यावरणप्रेमींनी कडाडून विरोध केलेला आहे. मेटघर किल्ला ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेत रोपवेविरोधात ठराव केलेला आहे. अंजनेरी किल्ल्यावर विविध पक्ष्यांची वस्ती आहे. रोपवे केल्यास दुर्मीळ होत चाललेल्या या प्रजाती नामशेष होतील. ब्रह्मगिरी पर्वतावरील खडक सैल होत चालले आहेत. पावसाळ्यात मोकळे झालेले दगड कोसळतात. दोन्ही किल्ल्यावर दुर्मीळ वनस्पती आहेत. अशी अनेक कारणे सांगत पर्यावरणप्रेमींनी रोपवे उभारण्यास विरोध केला आहे. रोपवे उभारण्यापेक्षा पायथ्याच्या पहिल्या पायरीपासून विविध वृक्षांच्या रोपांची लागवड करून हिरव्यागार रोपांचा मार्ग तयार करण्याची अभिनव संकल्पना हाती घेतली आहे. प्रत्येक पायरीला रोपटे लावण्यात येत आहे. यावेळी तेथे उपस्थित भाविकांनीदेखील यात सहभाग नोंदवला. अनेक भाविकांनी आपल्या नावाने एका रोपाचे जतन ब्रह्मगिरी पर्वतावर करण्याची इच्छा व्यक्त केली.

वृक्ष संपत्तीने समृद्ध विविध भारतीय प्रजातींच्या रोपांची लागवड या निमित्ताने ब्रह्मगिरी येथे करण्यात येणार आहे. पर्यटनवाढीच्या नावाने सरकारी योजनांचा वापर करीत, हजारो वर्षांच्या पायी पर्यटनाच्या धार्मिक परंपरा मोडीत काढण्याचा डाव आहे तसेच केंद्र सरकारची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप यावेळेस पर्यावरणप्रेमींनी केला आहे. आदिवासींच्या जमिनी, वनजमिनी गिळंकृत करून फार्म हाउसच्या नावाने ब्रह्मगिरी पोखरला जात असून, पर्यावरणप्रेमींनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पर्यावरणप्रेमींकडून जनजागृती करत वृक्षसंपदेच्या रोपवे उपक्रमाचे उद्घाटन आनंद आखाड्याचे स्वामी गणेशानंद सरस्वती महाराजांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मेटघर ग्रामस्थ, हरित ब्रह्मगिरीचे ललित लोहगावकर, कैलास देशमुख, प्रकाश दिवे, जयंत दानी, जीवन नाईकवाडी यांच्यासह डॉ. संदीप भानोसे, भारती जाधव, कुलदीप कौर, निशिकांत पगारे, योगेश बर्वे, जगबीर सिंग, मनीष बाविस्कर आदी प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : ब्रह्मगिरीवरील रोपवेविरोधात 'वृक्षांचा रोपवे' उपक्रम appeared first on पुढारी.