नाशिक : पथक आणि विक्रेत्यांमध्ये पाठशिवणीचा खेळ, दुसऱ्याच दिवशी कारवाई थंडावली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

सराफ बाजारासह शहरातील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण तत्काळ हटविण्याचे आदेश देताना सलग १५ दिवस कारवाई सुरू ठेवण्याच्या सूचना मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार केल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी (दि. २७) कारवाई देखील केली गेली. मात्र दुसऱ्याच दिवशी कारवाई थंडावल्याने बाजारपेठेत पुन्हा एकदा अनधिकृतपणे दुकाने थाटल्याचे चित्र शुक्रवारी (दि.२८) दिसून आल्याने अतिक्रमण पथक आणि विक्रेत्यांमध्ये पाठशिवणीचा खेल सुरू असल्याचे दिसून आले.

सराफ बाजारात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढल्याने या भागातील व्यापारी अडचणीत सापडले आहेत. या भागातून दुचाकी वाहने चालविताना अक्षरश: कसरत करावी लागते. पार्किंगची सुविधा नसल्याने, ग्राहक देखील या भागात खरेदीसाठी जाण्यास धजावत नाहीत. यासर्व पार्श्वभूमीवर या भागातील अतिक्रमणे तत्काळ हटविण्यात यावी अशी मागणी सराफ व्यावसायिकांच्यावतीने मनपा आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार आयुक्तांनी अतिक्रमणे हटविण्याचे आदेश देताना सलग १५ दिवस कारवाई करावी अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी (दि.२७) पथकाने धडक कारवाई करीत बाजारपेठेतील अतिक्रमणे हटविली होती. मात्र, पथकाची पाठ फिरताच पुन्हा अतिक्रमणे थाटली गेली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे दुसऱ्याच दिवशी अतिक्रमण मोहिम थंडावल्याने, बाजारपेठेची स्थिती जैसे थे झाल्याचे चित्र दिसून आले. महापालिकेने पुढील काही दिवस कारवाईचा बडगा कायम ठेवावा, अशी मागणी याभागातील व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.

पक्क्या अतिक्रमणाचा मुद्दा

या भागातील काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर अतिक्रमण करीत पक्के बांधकाम केले आहेत. ही जागा त्यांनी भाडेकरूंना दिली आहे. त्यामुळे अगोदर पक्के अतिक्रमण तोडले जावे. कारण यामुळेच खऱ्या अर्थाने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. किरकोळ व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी पक्के अतिक्रमण काढल्यास परिसराचा श्वास मोकळा होण्यास मदत होईल, अशी भावनाही काही व्यापाऱ्यांनी बोलून दाखविली.

हेही वाचा : 

The post नाशिक : पथक आणि विक्रेत्यांमध्ये पाठशिवणीचा खेळ, दुसऱ्याच दिवशी कारवाई थंडावली appeared first on पुढारी.