नाशिक परिक्षेत्रातील चार हजार शस्त्रे जमा

पोलीसांचा छापा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणूकीच्या अनुशंगाने पोलिसांनी परवानाधारक शस्त्रे जमा करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार नाशिक परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यात सहा हजार शस्त्र परवानाधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यातील सुमारे चार हजार शस्त्रे पोलिसांकडे जमा झाली आहेत. तर उर्वरित दोन हजार व्यक्तिंनी त्यांच्याकडील शस्त्रे अद्याप जमा केेलेली नाही.

१६ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर संबंधित परवानाधारकांनी शस्त्रे पोलिसांकडे जमा करण्यास सुरूवात केली. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी परिक्षेत्रातील सर्व पोलिस अधीक्षक कार्यालयांना शस्त्रे जमा करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिक ग्रामीणसह जळगाव, धुळे, नंदूरबार आणि अहमदनगरच्या अधीक्षक कार्यालयातील विशेष शाखेने शस्त्र परवानाधारकांना नोटिसा बजाविल्या आहेत. त्यानुसार नागरिकांना त्यांच्याकडील शस्त्रे जवळील पोलिस ठाण्यात जमा करावी लागत आहेत. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व निवडणूक भयमुक्त वातावरणात होण्यासाठी शस्त्रे जमा करावी लागत असतात. त्यानुसार नाशिक परिक्षेत्रातील सुमारे चार हजार शस्त्रे पाेलिसांकडे जमा झाली आहेत. तर उर्वरित दोन हजार परवानाधारकांकडे शस्त्र जमा करण्यासाठी पोलिसांचा पाठपुरावा सुरू आहे. त्यापैकी काही परवानाधारक हे माजी शासकीय अधिकारी-कर्मचारी, सुरक्षारक्षक असल्याने त्यांची शस्त्रे जमा केली जाणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, नाशिक शहर पोलिसांनीही शहरातील चौदाशे शस्त्र परवानाधारकांना नोटिस दिली आहे. त्यांच्याकडील शस्त्रे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सीमावर्ती भागात नाकाबंदी

नाशिक परिक्षेत्रातील सीमावर्ती भागात ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी करण्यास सुरुवात केली आहे. गुजरात, मध्यप्रदेश राज्यांच्या सीमेलगत भागात पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या सुचनेनुसार परराज्यातून होणाऱ्या अवैध मद्य, गुटखा, अंमली पदार्थ वाहतूकीवर पोलिसांनी लक्ष ठेवले आहे. गत तीन आठवड्यांत पोलिसांनी सुमारे दोन कोटींचा अवैध मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा –

The post नाशिक परिक्षेत्रातील चार हजार शस्त्रे जमा appeared first on पुढारी.