नाशिक : पांजरापोळ… भाजपमध्येच खळखळ

bjp www.pudhari.news

नाशिक :  सतीश डोंगरे

उद्यम –

नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी पांजरापोळ जागेवरून सुरू असलेले घमासान आमदारांमध्ये मतभेद, पक्षांतर्गत खदखद, डावलणे, विश्वासात न घेणे, बिल्डरांशी व्यवहार व मलिद्यासाठी धडपड इथवर येऊन थांबले. त्यामुळे पांजरापोळ जागा नक्की नाशिकच्या औद्योगिक विकासासाठीच हवी की, हितसंबंध जपण्यासाठी हवी, अशी चर्चा आता नाशिककरांमध्ये रंगत आहे. वास्तविक, यापूर्वीही एका हेवीवेट राजकीय हस्तक्षेपामुळे ही जागा चर्चेत आली होती. त्यावेळीही जागा संपादन करण्यासाठी बराच प्रयत्न केला गेला. मात्र, त्यात अपयश आले. आता नव्याने भाजप आमदाराने जागेचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, भाजपमधील अंतर्गत कलहच या जागेमुळे चव्हाट्यावर आला.

चुंचाळे शिवारात सुमारे दोन हजार एकरपेक्षा अधिक असलेली पांजरापोळची जागा उद्योगांसाठी संपादित केली जावी, ही नाशिकच्या उद्योजकांची जुनी मागणी आहे. सातपूर, अंबड या प्रमुख औद्योगिक वसाहतीला कनेक्ट असलेली ही जागा उद्योगांना मिळाल्यास या ठिकाणी ‘अँकर इंडस्ट्री’ उभी राहील. ज्यामुळे नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राला बूस्ट मिळेल. मोठे प्रकल्प आल्यास रोजगारनिर्मिती होईल. पर्यायाने नाशिकचे औद्योगिक क्षेत्र देशातील प्रमुख औद्योगिक क्षेत्रांच्या नकाशावर झळकेल. नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण बाब असली, तरी दुसरी बाजू ही पर्यावरणाशी निगडित आहे. कारण नाशिक हे आल्हाददायक वातावरणासाठी ओळखले जात असल्याने, या जागेवरील वनसंपदा नष्ट झाल्यास त्याचा मोठा परिणाम नाशिकच्या वातावरणावर होईल. आताच आपण नाशिकच्या वातावरणाची तुलना पुण्याच्या वातावरणाशी करीत आहोत. पुण्याप्रमाणे आपली गत होऊ नये, असे दाखलेही अनेकांकडून दिले जातात. त्यामुळे नाशिकचे आल्हाददायक वातावरण टिकवून ठेवणे हे नाशिककरांसमोर नक्कीच आव्हान आहे. पांजरापोळ जागेवर सुमारे दोन अडीच लाख झाडे आहेत. येथे समृद्ध अशी जैवसाखळी अस्तित्वात आहे. त्यामुळे ही जागा गेल्या काही काळापासून नाशिकसाठी ‘ऑक्सिजन हॉटस्पॉट’ ठरत आहे. नेमके हे दोन मुद्देच भाजपच्या आमदारांनी हेरत अंतर्गत खदखद बाहेर काढली. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी उद्योगांच्या बाजूने भूमिका घेत थेट उद्योगमंत्र्यांसोबत बैठक घेऊन जागा संपादनासाठी प्रयत्न सुरू केले, तर नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी पर्यावरणाची बाजू घेऊन पांजरापोळ जागेच्या भूसंपादनाला विरोध दर्शविला. अर्थात दोन्ही आमदारांच्या वादात पक्षातील इतर पदाधिकार्‍यांनी उडी घेतल्याने पांजरपोळ जागेवरून सध्या भाजपमध्येच दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी यांनी आमदार सीमा हिरे यांच्या बाजूने आपला आवाज बुलंद केला. दुसरीकडे आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी पांजरापोळ जागेच्या वादात न पडता आमदार देवयानी फरांदे यांच्याविरोधात मोर्चा उघडला. फरांदे या नेहमीच आम्हाला डावलत असून, त्यांची भूमिका न पटण्यासारखी असल्याची उघड नाराजी त्यांनी बोलून दाखवली. आमदारांचा हा वाद सुरू असतानाच भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी थेट पत्रकार परिषद घेत पांजरापोळप्रश्नी पक्षाची भूमिका जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार पांजरापोळ जागा उद्योगाला हवी, मात्र भाजप पर्यावरणप्रेमी असल्याने येथील वृक्षसंपदेचाही विचार झाला पाहिजे, अशी दुटप्पी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. पक्षाची भूमिका जाहीर केल्याने आमदारांमधील वाद संपुष्टात येणार काय? आमदारांना विश्वासात घेऊन पक्षाने भूमिका स्पष्ट केली काय,या प्रश्नांवर मात्र त्यांनी समर्पक उत्तर देणे टाळले तत्पूर्वी त्यांनी बिल्डर, मलिदा यांसारख्या शब्दांचा प्रयोग करताना पक्षकलह त्यांना लपवून ठेवता आला नाही. एकंदरीत पांजरापोळ जागेचा प्रश्न उपस्थित करून भाजपने आपल्या अंतर्गत कलहाला फोडणी तर दिली नाही ना? अशी चर्चा यानिमित्त रंगत आहे.

The post नाशिक : पांजरापोळ... भाजपमध्येच खळखळ appeared first on पुढारी.